महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहिलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सहा वर्षांत पूर्ण झाले; मात्र मुंबई- गोवा महामार्गाचे काम १६ वर्षे झाली तरीही अद्याप अपूर्णच आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ कि.मी.चा असून, तो सहा वर्षांत पूर्ण झाला तरीही मुंबई-गोवा महामार्ग ४७१ कि.मी.चा असूनही सोळा वर्षे उलटली तरी पूर्ण झालेला नाही. याबाबत सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी मागणी पर्यटकांकडूनच होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या आरवली ते लांजा हा जवळपास ६० किलोमीटरच्या महामार्गाचे काम रखडले आहे. सध्या संथगतीने काम सुरू आहे. महामार्गाच्या कामाला दिरंगाई केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांना काढून नव्याने तिसऱ्या ठेकेदाराला काम दिले तरीही हे काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गावर अपघात होत आहेत.
कोकणातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मागेच पडला असून, कोकणवासीयांना कित्येक वर्षांपासून न्याय मिळालेला नाही. कोकणवासीयांचा अंत सरकार आणखी किती दिवस पाहणार? असा सवालही प्रवाशांमधून विचारला जात आहे. एका पर्यटकाने तर मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करायला का येत नाही, त्याचा व्हिडिओच व्हायरल केला आहे. सध्या निवळी येथील कोकजेवठार येथे टोलनाक्याचे काम जोरदारपणे सुरू आहे; मात्र त्याच्याच शेजारी असलेले खड्डे सध्या जीवघेणे ठरत आहेत. संगमेश्वरसह लांजा बाजारपेठेतील पुलाची कामे संथगतीने सुरू आहेत.