राज्याच्या राजकारणात याआधी अनेकवेळा उध्दव आणि राज हे दोन्ही ठाकरेबंधू एकत्र येण्याच्या चर्चा अनेकवेळा रंगल्या आहेत. या दोन बंधूंनी एकत्र यावे अशी अनेकांची इच्छा आहे. या इच्छेपोटीच राजकीय वर्तुळात हे दोन बंधू एकत्र येणार अशी चर्चा अनेकवेळा होते. त्याचप्रमाणे आता राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार अशा चर्चाही अलीकडच्या काळात सातत्याने सुरू आहेत. सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाट यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी सुतोवाच् केले होते. त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेतील आणखी एका आमदाराने ही शक्यता व्यक्त केली असून दोन शिवसेना एकत्र याव्यात यासाठी आपण प्रयत्न करू असे आ. संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांनी एकत्र यायला हवे, दोन शिवसेना एकत्र यायला हव्यात अशी भूमिका सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते ना. संजय शरसाट यांनी गेल्या आठवड्यात मांडली होती. संधी मिळाली तर हे दोन नेते एकत्र यावेत यासाठी आपण प्रयत्न. करू असेही ना. शिरसाट यांनी म्हटले होते.
अचानक माघार – मात्र स्वपक्षीयांसह सहकारी भाजप नेत्यांनी कान टोचल्यानंतर आणि ठाकरे गटाने टोलवल्यानंतर त्यांनी या पुढाकारातून माघार घेतली. आता पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा केला आहे.
आ. गायकवाड काय म्हणाले? – शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की, राजकारणामध्ये कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो. कालचा शत्रू उद्याचा मित्र आणि कालचा मित्र उद्याचा शत्रु, हे सगळं समीकरण असतेः कधी आज आम्हाला कोणाच्या विरोधात बोलावे लागेल, उद्या ते सोबत आले तर त्यांचं गुणगान गावे लागते, हे राजकारण आहें असं आ. संजय गायकवाड म्हणाले.
सकारात्मक पाऊल – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले होते की, मला संधी मिळाली, तर मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन. यावर प्रतिक्रीया विचारली असता आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जर सकारात्मक पाऊल दोन्हीकडून पडत असेल तर हा विचार चुकीचा आहे असं वाटत नाही. शेवटी हिंदुत्ववादी विचाराचे लोक एकत्र काम करत असतील तर चांगला विचार आहे, असं गायकवाड म्हणाले.
गटबाजी नाही – शिवसेना शिंदे गटातील काही आमदारांवर देवेंद्र फडणवीसांचे नियंत्रण असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर संजय गायकवाड म्हणाले, आमच्या शिवसेनेत कुठलेही गट नाहीत. आमचा नेता खंबीर आहे. सगळे आमदार आम्ही एका जीवाचे आहोत. आमच्याकडे कुठलीही गटबाजी होणार नाही. असा दावाही त्यांनी केला.