सीएसएमटी रेल्वेस्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेस या तीन गाड्यांचा प्रवास २८ फेब्रुवारीपर्यंत ठाणे आणि दादर रेल्वेस्थानकापर्यंतच सुरू राहणार आहे. विस्तारीकरणाचे काम शिल्लक असल्यामुळे हा कालावधी वाढला आहे. याबाबत कोकण रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सीएसएमटीच्या फलाट क्र. १२ आणि १३च्या विस्तारीकरणाबरोबरच पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे याचा फटका मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे प्रवाशांची ओढाताण व हैराणी होण्याची शक्यता आहे.
जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्या सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत धावत आहेत. सुरवातीला हा कालावधी ३१ जानेवारीपर्यंत होता; मात्र तो २८ फेब्रुवारीपर्यंत केला आहे. तसे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (१२१३४) या गाडीचा प्रवास ठाणे स्थानकावर संपणार आहे. मडगाव जंक्शन-सीएसएमटी तेजस (२२१२०) आणि मडगाव जंक्शन-सीएसएमटी जनशताब्दी (१२०५२) गाड्या २८ फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत.
प्रवाशांची कसरत – दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील गर्दीचे प्रमाण कमी आहे. मार्च महिन्यात शिमगोत्सवाला सुरुवात होईल. त्या कालावधीत प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कामांचा तेवडासा परिणाम होणार नाही; मात्र नियमित प्रवास करणाऱ्यांना थोडी कसरत करावी लागणार आहे.