गतवर्षी मार्च महिन्यामध्ये शिमगोत्सवाचा ढोल घुमू लागताच होळी पौर्णिमेच्या पहाटेच्या दरम्यान उन्हाळे येथील गंगातीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर, गेल्या सुमारे ११ महिन्यांपासून गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री वास्तव्य कायम असल्याची माहिती गंगा देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत घुगरे यांनी दिली. या काळात सुमारे चार ते पाच लाख भाविकांनी गंगास्नानाची अनुभूती घेतली आहे. गतवर्षी मार्च महिन्यामध्ये गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. तेव्हापासून ११ महिने गंगा प्रवाही आहे. गेल्या वर्षी शिमगोत्सवामध्ये आगमन झालेल्या गंगेच्या स्नानाची पर्वणी साधण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात आदी राज्यांतून गंगास्नासाठी भाविक आल्याचे घुगरे यांनी सांगितले.
गेली १४ वर्षे दरवर्षी आगमन – पाताळातून प्रकट होणाऱ्या गंगामाईचे उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री दर तीन वर्षांनंतर आगमन होते. आगमनानंतर पुढील सर्वसाधारण तीन महिने गंगामाईचे या ठिकाणी वास्तव्य असल्याची अनेक वर्षांपासूनची स्थिती राहिलेली आहे. अठराव्या शतकात सलग सदतीस वर्षे (१८०१-१८३७) दरवर्षी येणारी गंगा त्यानंतरच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे तीन वर्षांनंतर येत होती; मात्र २०११ पासून सातत्याने दरवर्षी गंगामाईचे आगमन होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पावसाळ्यामध्ये आगमन होऊन थेट शंभरांहून अधिक दिवस गंगेचे वास्तव्य राहिले आहे.