प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी पद्धतीने बीएएमएस डॉक्टर नियुक्त केले जातात; मात्र, एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या स्थानिक बीएमएस डॉक्टरला सेवामुक्त केले जाते. एमबीबीएस डॉक्टर पुढील वैद्यकीय शिक्षण वा ट्रेनिंगसाठी गेल्याने रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा बीएएमएस डॉक्टरची नियुक्ती केली जाते. त्यातून सर्वसामान्यांची हेळसांड होते. प्रशासकीय कारभाराचा खेळखंडोबा थांबणार कधी? असा सवाल शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी केला आहे. पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकरे यांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख नागले, नाना कोरगावकर, सुनील गुरव, सिद्धी शिर्सेकर, हर्षदा खानविलकर, मधू बाणे, सूर्यकांत सुतार आणि पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेतली.
या वेळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुणालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य पदे तत्काळ भरणा करण्याची कार्यवाही आणि रुग्णांना चांगली सेवा मिळावी, अशी मागणी केल्याची माहिती नागले यांनी दिली. तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्रातील एमबीबीएस डॉक्टरांच्या नऊपैकी केवळ तीन जागा भरल्या आहेत. सातत्याने सेवामुक्त केले गेल्याने स्थानिक बीएएमएस डॉक्टरचे करिअरही धोक्यात येते. या साऱ्यांमध्ये सर्वसामान्य रुग्णांची पुरती हेळसांड होत असून, त्याला जबाबदार असलेला प्रशासकीय खेळखंडोबा तत्काळ थांबवावा आणि या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध होण्याबाबत योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी नागले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कायमस्वरूपी डॉक्टर द्या… – तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील एमबीबीएस डॉक्टरांच्या नऊपैकी केवळ तीनच जागा भरल्या आहेत. सातत्याने सेवामुक्त केले गेल्याने बीएएमएस पदवी असलेल्या स्थानिक डॉक्टरांचे करिअरही धोक्यात येत आहेत. याचा सर्व परिणाम रुग्णांवर होऊन त्यांची हेळसांड होत आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि डॉक्टर नियुक्तीतील धरसोडीची पद्धत थांबवावी. तसेच रुग्णालयाला कायमस्वरुपी डॉक्टर उपलब्ध व्हावेत, याची कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.