महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ७ हजार ३२७ अपूर्ण कामापैकी २ हजार ६२४ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ४ हजार ७०३ अपूर्ण कामांमध्ये शासनाच्या आदेशानुसार ३० टक्के पेक्षा कमी पूर्तता झालेल्या २ हजार ५१५ कामांमध्ये पंचनामे करुन ती बंद करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार २ हजार ३६५ पंचनामे अपलोड झालेले आहेत. उर्वरित अपूर्ण कामांचे पंचनामे तयार करुन अपलोड करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे स्पष्टीकरण आज एमआयएसवरील आकडेवारीनुसार उपजिल्हाधिकारी (रोहयो) हर्षलता गेडाम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २० हजार ६१४ कामे अपूर्ण आहेत. त्यापैकी २०२१-२२ व त्यापूर्वीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर शासनाचा विशेष भर आहे. २०२०-२१ व त्यापूर्वीची एकूण कामे ७१ हजार ६२ होती. त्यापैकी ६३ हजार ७३५ अपूर्ण कामे पूर्ण झालेली आहेत. त्यापेकी ७ जानेवारीस एकूण ७ हजार ३२७ कामे अपूर्ण होती.
त्याव्यतिरिक्त शिल्लक कामांबाबत जिओ टॅगिंग वर प्रलंबित असलेली ४३१ कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिल्लक ११०५ कामांची निधी मागणी करण्यात आलेली आहेत. उर्वरित ६५२ अपूर्ण कामे तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. शासनाच्या १०० दिवसीय कृती आराखड्यानुसार मगांराम्रारोहयो आयुक्ताकडील आदेशनुसार ३ हजार ४१० अपूर्ण कामे १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १५ मार्चपर्यंत ८१५ कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार ६८२ कामे पूर्ण झाली असून उर्वरित सर्व कामे १० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.