यावर्षी गावखडी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कासवांच्या अंड्यांची घरटी सापडत असून, ती संरक्षित करण्यात आली आहेत. या संरक्षित घरट्यांमधून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत टप्प्याटप्प्याने ९०३ पिल्लांनी समुद्राकडे धाव घेतली आहे. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी किनाऱ्यावर कासवांचे अंडी घालण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर कासव संवर्धन केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर अनेक पर्यटकांना पिल्ले समुद्रात जातानाच क्षण अनुभवायला मिळत आहे. पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या उपस्थितीत पर्यटकांच्या साक्षीने कासवाची पिल्ले किनाऱ्यावर सोडण्यात आली. या पिल्ल्यांनी काही वेळातच समुद्राच्या पाण्यात प्रवेश केला. याप्रसंगी साळोखे म्हणाले, ‘या किनाऱ्यावर कासवांच्या घरट्यांचे संवर्धन केले जात आहे. या गोष्टीचे पर्यटकांना आकर्षण आहे. या गोष्टी प्रत्यक्ष कुठेही पाहता येत नाहीत.
त्यामुळेच सायंकाळच्या वेळी अनेक पर्यटक या किनाऱ्याकडे आवर्जून येत आहेत. ‘गेली अनेक वर्षे या किनाऱ्यावर कासवाच्या घरट्यांचे संवर्धनाचे काम प्राणीमित्र व वनविभागाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे पर्यटकही येथे येत आहेत. सध्या टप्प्याटप्प्याने कासवे या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येत आहेत. गेल्या दोन दिवसात १६ घरटी तयार झाली. त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. या संदर्भात वनाधिकारी साबणे म्हणाले, या वर्षीच्या हंगामामध्ये आत्तापर्यंत फक्त गावखडी समुद्रकिनाऱ्यावर १२९ घरटी सापडली आहेत. त्यामध्ये १३ हजार ४०३ अंडी आहेत. त्यातील ९०३ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे. उर्वरित अंड्यांमधून पिल्ले बाहेर आल्यानंतर ते त्या त्या वेळी सोडण्यात येणार आहेत.