संवेदनशील हापूसची उन्हातून वाहतूक केल्यास फळामध्ये साका तयार होण्याची भीती असते. त्यामुळे फळ खराब होते आणि त्याचा फटका आंबा बागायतदाराला बसतो. हे टाळण्यासाठी दूरवर आंबा वाहून नेण्याच्या उद्देशाने ‘सिंधू-रत्न समृद्ध’ योजनेतून १ वातानुकूलित गाडी पणन मंडळाकडे उपलब्ध झाली आहे. त्याचा उपयोग आंबा बागायतदारांना होणार आहे. त्याचे लोकार्पण उद्या (ता. १) पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. बागायतदार किंवा व्यावसायिक हापूस आंबा विक्रीसाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पाठवित असतात. याच कालावधीत प्रचंड उष्मा असल्यामुळे अनेक वेळा दूरवर वाहतूक करताना हापूस आंब्याचे मोठे नुकसान होते. बागायतदार ज्याप्रमाणे निर्यातीसाठीचा आंबा वातानुकूलीत गाडीतून नेतात, त्याचप्रकारे राज्याच्या कानाकोपऱ्यात पिकलेला आंबा वाहून नेला, तर उन्हामुळे होणारा त्रास जाणवणार नाही.
तसेच स्वस्त भाडेदरात ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचेल आणि मालाची गुणवत्ता अधिक दर्जेदार राहील. त्याचबरोबर हापूसला दरही चांगला मिळेल. आंब्याचे मार्केटिंग अधिक सक्षम करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सहकारी आंबा उत्पादक संघाच्या वतीने शेतकऱ्यांकारिता २ रेफर व्हॅनची मागणी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे केली होती. ही मागणी त्यांनी त्वरित मंजूर केली होती. सिंधू-रत्न समृद्ध योजनेमार्फत गाड्या खरेदी करण्याचे आदेश पणन मंडळाला दिले होते. त्यापैकी १ गाडी नुकतीच पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाला मिळाली आहे. ऐन हंगामात ही गाडी आंबा बागायतदारांना वापरण्यास मिळणार आहे. या गाडीचा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी ८.३० वाजता पोलिस परेड मैदानावर आयोजित केला आहे.