26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriरत्नागिरी कदमवाडीतील देवीची सहाण हटविण्याची 'म्हाडा'ची नोटीस

रत्नागिरी कदमवाडीतील देवीची सहाण हटविण्याची ‘म्हाडा’ची नोटीस

म्हाडाने दिलेली नोटीस मागे न घेतल्यास भक्तांच्या भावना तीव्र होण्याची शक्यता आहे.

कोकणनगर नजीकच्या कदमवाडी येथील देवीची सहाण अनधिकृत ठरवत तीन दिवसांत ती हटवण्याची नोटीस महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. या सहाणेवर शीळ येथील ग्रामदेवता श्री रणवीर कालिका, वाघजाई देवस्थानची पालखी विराजमान होते. शिवाय या जागेच्या मूळ मालकाने सहाणेची जागा राखीव ठेवण्याची अट ‘म्हाडा’ला घातली होती. असे असताना सहाण हटवण्याची नोटीस बजावल्यामुळे भाविकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, देवस्थाननेही नोटिसीद्वारे ‘म्हाडा’ला उत्तर दिले आहे. येथील जागा ‘म्हाडा’ने संपादित करण्याआधीपासून ही सहाण येथे आहे. येथील गावदेवी पालखीच्या या सहाणेला खूप महत्त्व आहे. पालखी जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी सहाणेची उभारणी केली जाते. पिढ्यान्पिढ्या येथे शीळ देवस्थानची पालखी येते. परंपरेनुसार धार्मिक विधी होत असतात. शिमगोत्सवात येथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

श्री. गावखडकर बंधू (कदम) हे मानकरी असून, म्हाडाला जागा देताना त्यांनी सहाणेची जागा राखीव ठेवून भूसंपादनाला परवानगी दिली होती. सहाणेच्या परिसरातील भूखंडाला कुंपणही केलेले आहे. त्यामुळे भूखंडाचा विकास अगर विक्री करण्यापूर्वी सहाणेचे क्षेत्र वगळणे आवश्यक आहे. असे असताना ‘म्हाडा’ने ही नोटीस बजावली आहे. यामुळे श्री रणवीर कालिका, वाघजाई ग्रामदेवता देवस्थानच्या वतीने अध्यक्ष विजय देसाई यांच्यामार्फत अॅड. अविनाश शेट्ये यांनी म्हाडालाही नोटीस बजावली आहे. ‘सहाणेची बांधकाम हटवण्याची कारवाई केल्यास देवस्थानच्या रूढी, परंपरा संपुष्टात येणार आहेत. भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत. त्यामुळे जनक्षोभनिर्माण होण्याची शक्यता आहे. आपण धार्मिक मूल्यांची पायमल्ली केल्यास देवस्थानच्या वतीने आपल्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल’, असा इशारा देवस्थानने या नोटिसीतून म्हाडाला दिला आहे.

भक्तांमध्ये संताप – ‘म्हाडा’ने थेट पालखीची सहाण हटविण्याची नोटीस पाठविल्यामुळे भक्तांमध्ये संताप निर्माण झाला आहे. म्हाडाने दिलेली नोटीस मागे न घेतल्यास भक्तांच्या भावना तीव्र होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीही सहाणेची जागा वगळण्याची सूचना यापूर्वीच केली होती. तरीही म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नोटीस पाठविण्याचे धाडस कसे केले, असा प्रश्न भक्तांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular