26.6 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRajapurआंबोळगड किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत शासनाचे दुर्लक्ष

आंबोळगड किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत शासनाचे दुर्लक्ष

झाडाझुडुपांचाही किल्ल्याला वेढा पडलेला आहे.

तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या मुखाजवळ आणि मुसाकाजी बंदराच्या परिसरात आंबोळगड येथे बांधण्यात आलेल्या किल्ले आंबोळगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘स्वराज्य अन् पराक्रमाची’ आजही साक्ष देत आहे. या आंबोळगड किल्ल्याच्या डागडुजीसह संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. आंबोळगड येथे एसटी थांब्याच्या येथे एका उंच भागावर किल्ल्याचे जुने बांधकाम आहे. त्याच ठिकाणी पाण्याची टाकी, बुरुजाचे काही अवशेष असून तटबंदी आणि तेथून जवळच असलेली तोफ या इतिहासाच्या पाऊलखुणांची साक्ष देतात. समुद्रसपाटीपासून काही मीटर अंतरावर बांधण्यात आलेला किल्ला आंबोळगडची तटबंदी पुरती ढासळली आहे. झाडाझुडुपांचाही किल्ल्याला वेढा पडलेला आहे. नाटे येथील घेरायशवंतगड किल्ल्याची डागडुजी आणि संवर्धन होते. किल्ले आंबोळगड डागडुजीसह जतन आणि संवर्धनाच्या वर्षानुवर्षे प्रतिक्षेत राहिला आहे. हा किल्ला स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे.

आंबोळगड गावामध्ये समुद्रसपाटीपासून काही किमी अंतरावरील उंचवट्यावर बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्याचे बांधकाम नेमके कोणी आणि कधी झाले याबाबत ठोस माहिती सद्यःस्थितीत उपलब्ध नाही. सुमारे १२०० चौरस मीटर क्षेत्रफळात विस्तारलेल्या या किल्ल्याच्या दक्षिणेला समुद्र आहे, तर उत्तर आणि पश्चिमेस खंदक खोदलेले आहेत. ते बुजलेल्या स्थितीत आहेत. किल्ल्याची तटबंदी पूर्णतः ढासळलेली आहे. तिथे एकमेकांवर चिरे रचून सुमारे १० ते १५ फूट उंचीची तटबंदी उभारली आहे. किल्ल्याच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून गडामध्ये प्रवेश करताना उजव्या बाजूला एक बुरूज तर डाव्या बाजूला भिंत आहे. त्यापुढे असलेला बुरूज पूर्णपणे ढासळलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर शत्रूने थेट मारा करता येऊ नये, अशी बांधकामाची रचना तेथे केलेली होती.

किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर मध्यभागी एक मोठे वडाचे झाड असून, किल्लाभर विस्तारलेल्या या झाडाने जणू काही किल्ला व्यापलेला आहे. या झाडासमोर एक तुटलेली तोफ असून, त्या झाडामागे आयताकृती विहीर आहे. विहिरीच्या समोर आणि बाजूला दगडी पाण्याचे पात्र असून, विहिरीच्या उजव्या बाजूला उद्ध्वस्त वास्तू दिसते. या किल्ल्याच्या परिसरामध्ये स्वयंभू श्री गणेशमंदिर, जागृत श्री महापुरुष देवस्थान, स्वयंभू श्री जटेश्वर देवस्थान आहे, तर समोर विस्तीर्ण असा शांत आणि निळाशार पाण्याचा समुद्रकिनारा आहे. आंबोळगडापासून सुमारे चार ते पाच किमी अंतरावरील नाटे येथील घेरायशवंतगड किल्ला शासनातर्फे जतन केला जात आहे; परंतु आंबोळगड किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

बांधकामाची नोंद नाही – किल्ले आंबोळगड हा केव्हा बांधण्यात आला, याबाबतची ठोस माहिती उपलब्ध नाही. तरीही मुसाकाजी हे प्राचीन बंदर आणि लगतच विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टीवरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नाटे येथील घेरायशवंतगड किल्ल्यासोबत किल्ले आंबोळगडची उभारणी केल्याचे काही नोंदीवरून सांगितले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular