मुलीसोबत मैत्री करुन तिचा आणि तिच्या आईचा विश्वास दृढ करुन १६ लाखाचे दागिने बँकेत ठेवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतः च्या आर्थिक अडचणीचे कारण सांगून फसवणूक करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रवण सचिन टकेल (वय २१, रा. तारादर्शन अपार्टमेंट, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना २८ मार्च २०२५ सकाळी दहाच्या सुमारास शहरातील जोशी आर्केड, जोशी पाळंद येथे घडली. अखेर याबाबत पोलिसांत फिर्याद देण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित श्रवण टकेलने फिर्यादींच्या मुलीशी मैत्री करुन तिचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर स्वतः च्या आर्थिक अडचणीचे कारण सांगून फिर्यादी महिलेचे तब्बल १६ लाख रुपयांचे दागिने त्यांच्या मुलीकडून घेतले व ते एका बँकेत तसेच एका पतपेढीत गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी वेळो वेळी श्रवण टकेल याला ८ सोन्यांच्या बांगड्या, २ सोन्याचे नेकलेस, १ बाजुबंद, १ अंगठी, १ जोड सोन्याचे गोठ असे गहाण टाकलेले दागिने परत करण्याची संधी दिली. परंतू त्याने ते दागिने परत न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी महिलेने गुरुवारी (ता. १५) शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.