तालुक्यातील वडद येथील पूजा चंद्रकांत शिंदे यांच्या घरात रात्री दोन वाजता बिबट्या शिरला. सुदैवाने यावेळी घरात कोणीच नव्हते. शेजारच्या घरातील मंडळींना रात्री शिंदेंच्या घरातून आवाज आला म्हणून मंडळी पाहण्यासाठी गेली. तेव्हा हॉलमध्ये असलेल्या बिबट्याला माणसांची चाहूल लागताच बंद खिडकीवर झेप घेतली आणि खिडकी फोडून बिबट्या जंगलात पसार झाला. गेले १५ दिवस वडद गावात सायंकाळी बिबट्या फिरताना दिसत आहे. याची माहिती सरपंच, उपसरपंच, पोलिसपाटील यांनी वन विभागाला कळवली आहे. २० जूनला रात्री बिबट्या वडदचे ग्रामदैवत व्याघ्रांबरी मंदिर परिसरात फिरत होता. या मंदिराशेजारीच गणपतवाडी आहे. तेथे पूजा चंद्रकांत शिंदे राहतात. घरात कोणीच सोबतीला नसल्याने बिबट्याच्या भीतीने पूजा शिंदे रात्री जेवण आटपल्यावर आवराआवर करून शेजारील घरात झोपायला गेल्या होत्या.
मध्यरात्री दोनच्या सुमारास घराच्या मागील बाजूला असलेल्या पडवीवर कोणीतरी पडल्यासारखा आवाज आला. या आवाजाने शेजारील मंडळी जागी झाली. शिंदेच्या घरात चोरटा तर शिरला नाही ना अशी शंका आली. म्हणून पूजा शिंदे यांनी सावधपणे घराचे कुलूप उघडले. हळूवार दरवाजा उघडत असतानाच हॉलमधील खिडकीची काच फुटली. त्या खिडकीतून बिबट्याला बाहेर जाताना त्यांनी पाहिले. शनिवारी (ता. २१) सकाळी सरपंच कोमल मुरमुरे, उपसरपंच संदीप धनावडे, पोलिसपाटील चारुता सोमण, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र करजकर, ग्रामस्था भिकाजी काजारे यांनी चंद्रकांत शिंदे यांच्या घराची पाहणी केली.
त्यावेळी घरामागील पडवीवरून उडी टाकून तेथील अर्धवट उघड्या खिडकीतून बिबट्या आत आल्याचे लक्षात आले. घरातील जमिनीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे दिसत होते. अचानक घराचा दरवाजा उघडण्याच्या आवाजाने बिबट्या सावध झाला. त्याने बंद खिडकीवर उडी मारली. त्यामुळे खिडकीची काच फुटली. त्यातून बिबट्या बाहेर पडून जंगलात पसारा झाला. त्यावेळी फुटलेल्या काचांना आणि खिडकीजवळ बिबट्याची भिस (केस) चिकटलेले आढळून आले आहेत.
पिंजरा लावण्याची मागणी – या संदर्भात वडदचे सरपंच कोमल मुरुमरे आणि उपसरपंच संदीप धनावडे यांनी सांगितले की, ‘हा बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी लोकवस्तीत शिरत आहे. सध्या गावातील भटकी कुत्री नाहीशी झाली आहेत. आता बिबट्याने मांजरांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. गावातील ५ ते ६ घरातील मांजरे नाहीशी झाली आहेत. चंद्रकांत शिंदे यांच्या घरातही मांजराचा पाठलाग करताना बिबट्या घुसला होता. हा बिबट्या वयाने लहान असावा, असे फुटलेल्या काचेवरून दिसत आहे. वनविभागाने आतातरी या गोष्टीची दखल घेऊन वडद गावात पिंजरा लावावा व बिबट्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावे.’