खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या एका किशोरवयीन विद्यार्थ्यांचा विंचूदंशाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सोहम मंगेश शिर्के (१६) या विद्यार्थ्याचा विंचूदंशाने उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान त्याला विंचूदंश झाला होता. यावेळी त्याला नातेवाईकांनी तातडीने तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, यावेळी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला डेरवण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोहमचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी तळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याबद्दल त्यांना नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती खेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी दिली आहे. सोहमच्या नातेवाईकांनी त्याला आधी खेड येथील खासगी रुग्णालयात नेले व पुन्हा कळंबणी रुग्णालयात नेले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला डेरवण येथे नेण्यात आले. यामध्ये खूप वेळ गेला, अशीही माहिती डॉ. खरटमोल यांनी दिली. या घटनेची नोंद खेड पोलिस स्थानकात करण्यात आली असून, अधिक तपास खेड पोलिस करत आहेत. तसेच आरोग्य विभागाकडूनही याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र एका खाजगी रुग्णालयाची चौकशी सुरू असून सरकारी डॉक्टरना वाचवण्यासाठी खटाटोप सुरू असल्याची चर्चा गावात सुरू आहे.