‘नाराज मी…? आणि कशासाठी..? आणि पक्षातील कोण नेते माझ्यावर नाराज आहेत आणि का…? सर्व नेत्यांच्या मनात माझ्याबद्दल आदर आणि प्रेम आहे….. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना भेटण्यासाठी मला वेळ घ्यावी लागत नाही….. मला कधीही, कोणत्याही वेळी त्यांची भेट सहज मिळते…… मला कोणीही अडवत आणि तपासणी देखील करत नाही…. त्यामुळे मी नाराज असण्याचे कारणच नाही. उलट येत्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने पक्षासाठी काम करण्याचा निर्धार मी केला आहे. त्यामुळे माझ्यावर जे टीकाटिप्पणी करत आहेत त्यांनी काही गोष्टी लक्षात घ्याव्यात’ अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.. चिपळूणमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी दोनच दिवसांपूर्वी मी शरद पवार यांची साथ सोडली, ही माझी राजकीय चूक होती’ असे विधान एका मुलाखतीत केले होते. तसेच आताचे राजकारण बघता आता थांबावे, बस करावे असेही म्हटले होते. या दोन्ही विधानांमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. आम. जाधव पक्षात नाराज आहेत, त्यांची घुसमट होत आहे, असे वृत्त गेले दोन दिवस सातत्याने मीडियामध्ये आहे. त्यामुळे साहजिकच वेगवेगळी चर्चा सुरू आहे. पण हजरजबाबीपणा व स्पष्टवक्ते म्हणून परिचित असलेले आम. भास्कर जाधव यांनी सोमवारी रोखठोकपणे आपली भूमिका मांडत सर्व चर्चाना पूर्णविराम दिला.
‘होय मी बोललो…..’ – मी शरद पवार यांची साथ सोडली ही चूक होती हे बोललो…. होय बोललो, आताही मी तेच सांगेन की चुक होती. परंतु असे बोलून मी माझा प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. आता जे उद्धव ठाकरेंना सोडून गेले, ते दिवसरात्र त्यांना अपशब्द वापरत आहेत. त्यांच्यासाठी माझे वक्तव्य एक संदेश आहे. मीही शिवसेना सोडली होती. परंतु पक्षाबद्दल किंवा शिवसेनाप्रम खांच्याबद्दल एकही अपशब्द काढला नाही. हा राजकीय प्रामाणिकपणा म झ्यात होता आणि तोच शरद पवार यांच्याबद्दलदेखील आहे. त्यामुळे मी जे बोललो त्यामध्ये चूक काहीच नाही, असे ठामपणे आम. जाधव म्हणाले.
ते नालायक, निर्लज्ज लोक – ज्यांनी शिवसेनेत सर्व पदे भोगली, मंत्रीपदे भोगली, गडगंज संपत्ती गोळा केली, ते नालायक, निर्लज्ज लोक आता पक्ष सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांना नको नको ते अपशब्द वापरतात. घाणेरडे आरोप करतात, त्यांनी माझा राजकीय प्रामाणिकपणा थोडा घ्यावा, हाच माझ्या त्या विधानाचा अर्थ होता, असे उघडपणे त्यांनी नमूद केले.
मी नाराज नाही – मी नाराज असल्याचे व मला टार्गेट केल्याच्या कंड्या पिकवल्या जात आहेत. पण उघडपणे सांगतो. भास्कर जाधव नाराज होऊन शांत बसणारा नव्हे. आणि का नाराज होऊ, कशासाठी? माझ्या पक्षात मला पूर्ण आदर आणि सन्मान आहे. पक्षातील वरिष्ठ नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते यांच्या मनात माझ्याबद्दल पूर्ण आदर आणि प्रेम आहे. ते उघडपणे माझ्या कामाचे कौतुक करतात आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना भेटण्यासाठी तर मला कधीच वेळ घ्यावी लागत नाही. मी कोणत्याहीवेळी त्यांची भेट घेतो आणि तेही कोणत्याहीवेळी मला बोलावून घेतात आणि चर्चा करतात. त्यामुळे नाराज असण्याचे कारणच नाही, अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नाराजीच्या अफवा – विरोधीपक्ष नेतेपद मिळाले नाही, म्हणून नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण भास्कर जाधव इतका छोटा आणि हलका माणूस नव्हे. हे सरकार मला घाबरले आहे. मला विरोधीपक्ष नेतेपद दिले तर भास्कर जाधव काय करेल हे त्यांना माहित आहे. त्यामुळे ते घाबरले आहेत.
अंगावर येऊ नका – आणि टार्गेट करणे वगैरे हा विषय सोडा, मला टार्गेट करण्याची हिंमत कोणाकडे नाही आणि तसे धाडस कोणी करूच नये. मी विरोधकांना पण सांगतोय उगाच माझ्या अंगावर येऊ नक्का. सोडणार नाही. आणि आमच्या पक्षातले पण काही जण टीकाटिप्पणी करत आहेत, त्यांनाही सांगतोय जरा लक्षात घ्या, असे रोखठोकपणे आमदार भास्कर जाधव म्हणाले. मी नाराज नाही, उलट येत्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने पक्षासाठी काम करणार असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.