महापालिका व नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. या कार्यक्रमानुसार दिवाळीच्या आसपास निवडणुका होतील, असा अंदाज होता; मात्र, अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळाली असून, तसा शासनादेशही काढला आहे. हे पाहता पालिका निवडणुकीचा मुहूर्त नव्या वर्षातच निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणूक घेण्याच्या निर्देशानंतर पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला. चार सदस्यांचा प्रभागाचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठीचे नोटिफिकेशनही काढण्यात आले.
त्यानुसार ११ जूनपासून प्रगणक गटाची मांडणी, गुगल मॅपवर नकाशे तयार करणे, ३१ जुलैला प्रभागरचनेचा मसुदा तयार करणे, २२ ऑगस्टला प्रभागरचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणे, ९ सप्टेंबरला प्रभागरचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, त्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभागरचनेच्या अधिसूचनेस प्रसिद्धी असा कार्यक्रम आखून दिला होता. आता अंतिम प्रभागरचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी ३ ते ६ ऑक्टोबर अशी जवळपास एक महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. इच्छुकांची घालमेल सुरू आहे.