कशेडी घाटात टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलत पोलिसांनी या खुनाला वाचा फोडली. चिपळुणांतील कारे व्यावसायिकाचा खून झाल्याचे तपासात पुढे येताच पोलिसांनी या खुनाच्या आरोपाखाली वंदना दादासाहेब पुणेकर (३६, रा. जयसिंगपूर, कोल्हापूर) हिच्यासह तिच्या नवऱ्याला आणि आणखी एकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी वंदना दादासाहेब पुणेकर हिने यापूर्वी ५ जणांशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली असल्याचे पोलिस निरीक्षक आनंद रावडे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. तिच्यावर सांगली जिल्ह्यात दोन चोरीचे गुन्हेही दाखल असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणात वंदना पुणेकरसह मोहन पांडुरंग सोनार (५४, रा. बोरसूत, संगमेश्वर, रत्नागिरी) आणि अक्षय जाधव या तिघांना पोलादपूर पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक वृत्त असे की, चिपळूण तालुक्यातील सती येथे राहणारे सुनील दादा हसे (५४, मूळ रा. अंबड-अकोले, नाशिक) हे वॅगनार कार भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते. लिफ्ट देण्याच्या निमित्ताने त्यांची वंदना पुणेकरशी ओळख झाली. सुनील हसे हे श्रीमंत असल्याचे तिला वाटल्याने तिने त्याला फसवण्याचे डावपेच आखले. मात्र ते फारसे श्रीमंत नसल्याचे लक्षात येताच तिने सुरुवातीला सुनील हसे यांना गुंगीचे औषध पाजले आणि नंतर कारच्या मागील आसनावर बसून ओढणीने गळा आवळून त्यांना मारले, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर संशयित आरोपी मोहन सोनार व अक्षय जाधव यांच्या मदतीने मृतदेह पोलादपूर हद्दीतील कशेडी घाटात जुन्या महामार्गालगतच्या दरीत फेकून दिला. २७ एप्रिलला हा खून झाला.
३० एप्रिल रोजी कशेडी घाटात पहाटे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर भोगाव-पोलादपूरच्या पोलीस पाटील शुभांगी उतेकर यांनी पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. फक्त ४ दिवसांत पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय जाधवला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उर्वरित दोघांनाही पोलिसांनी कर्नाटक सीमाभागातून अटक केली. ते सलग दोन महिने पोलिसांना चकवा देत लपून बसले होते. वंदना पुणेकर हिने आधी पाच जणांशी लग्न केल्याची आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याची कबुली दिली असल्याचे पोलिस निरीक्षक आनंद रावडे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.