आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम आता राष्ट्रीय अभिमान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव बनली आहे. यावर्षीच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ या घोषवाक्याखाली ८ ते १५ ऑगस्ट या कालावधीत एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश स्वातंत्र्यदिन साजरा करताना स्वच्छता, आरोग्य, जलसंधारण आणि जनजागृती वाढवणे हा आहे. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) आणि जलजीवन मिशन यांच्या वर्धापनदिनानिमित्त १५ ऑगस्टला या मोहिमेची सांगता प्रमुख पायाभूत सुविधांच्या ठिकाणी ध्वजवंदन करून होणार आहे.
या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे. या मोहिमेअंतर्गत गावे आणि ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये गावांमध्ये मोहिमेचा प्रारंभ करणे, जनजागृती उपक्रम राबवणे आणि नागरिक व विद्यार्थ्यांकडून ‘स्वच्छ सुजल गाव’ प्रतिज्ञा घेणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणे, पाणवठे, पाणी आणि स्वच्छतेशी संबंधित जागा (उदा. सार्वजनिक शौचालये, घनकचरा व्यवस्थापन केंद्र) यांची लोकसहभागातून स्वच्छता करणे, प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आणि पाण्याची गळती थांबवणे हे उपक्रमही घेतले जातील.
जलजीवन पाण्याच्या टाक्या, मिशन अंतर्गत स्रोत, नळजोडणी, पंपहाऊससारख्या पायाभूत सुविधांची स्वच्छता आणि सुशोभीकरण केले जाईल. कचरा व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक, जलसंवर्धन, भूजल पुनर्भरण, जलस्त्रोत संरक्षण आणि एकल – वापर प्लास्टिक टाळण्याबाबत जनजागृती केली जाईल. पाणी आणि स्वच्छतेच्या पायाभूत सुविधांच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी ध्वजवंदन करणे आणि “हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत वैयक्तिक कुटुंबांनी ध्वजवंदन करणे हे देखील या उपक्रमांचा भाग आहे. मोहिमेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या “स्वच्छता चॅम्पियन” आणि स्वयंसेवकांचा ग्रामपंचायत स्तरावर सत्कार केला जाईल. या मोहिमेसाठी “हर घर स्वच्छता” आणि “हर घर तिरंगा” हे हॅशटॅग वापरले जातील. या मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, पाणी व स्वच्छता समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगटांचे सदस्य, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिक यांचा सहभाग घेतला जाईल.