गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू झाला आहे. त्यामुळे बुधवारी (ता. ३) रात्री मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. चिपळूण शहरातील पाग पॉवरहाऊस ते बहादूरशेख नाका या दरम्यान महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालक या कोंडीत अडकून पडले. साजरा करून गणेशोत्सव परतलेल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमानीही खासगी गाड्या, बसेसद्वारे मुंबई, पुण्याकडे परतू लागले आहेत. चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतुकीवरील ताणही वाढला आहे.
चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून जादा गाड्या तसेच चिपळूण ते पनवेल अशा मेमो गाड्या सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय एसटी महामंडळाच्या हजारो गाड्याही फेऱ्या मारत आहेत. तरीदेखील खासगी वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे महामार्गावरील वाहतूककोंडी टाळता आली नाही. चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही मोठ्या प्रमाणात एसटी सोडल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे शहरात आणि महामार्गावर काही तास कोंडी कायम राहिली.
११ तासांचा प्रवास – महामार्गावर होत असलेल्या वाहतूककोंडीचा फटका मुंबईहून येणाऱ्या वाहनचालकांनाही बसलेला आहे. बुधवारी रात्री मुंबईहून आलेल्या वाहनचालकांना ११ तास मुंबई ते रत्नागिरी प्रवास करावा लागला. त्यात रायगडमधील काही चौक आणि रत्नागिरीतील खेड, चिपळूण, संगमेश्वर पट्ट्यात विलंब झाला आहे.