पिंपळी येथील जुना पूल खचल्यानंतर खडपोली मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली. पर्याय असलेल्या पेढांबे ते खडपोली मार्गावरही गेली काही दिवस अवजड वाहतूक बंद होती. याबाबत प्रांतकार्यालयात झालेल्या बैठकीनंतर बुधवारी रात्रीपासून २० टनी अवजड वाहतूक सुरू केली. यापुढे रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीत एमआयडीसीत जाणारी अवजड वाहने सोडली जाणार आहेत. ही वाहने परत जाताना वालोटी, दळवटणे, मोरवणेमार्गे सोडण्यात येणार आहेत. गाणे-खडपोली एमआयडीसीतील अवजड वाहतुकीवर मार्ग काढण्यासाठी बुधवारी येथील प्रांत कार्यालयात पोलिस, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, एमआयडीसी आदींच्या उपस्थितीत प्रांताधिकारी आकारा लिगाडे यांनी बैठक घेत वाहतुकीचे नियोजन केले. त्यानुसार २० टनापर्यंतची वाहने रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शिरगांव-पेढांबेमार्गे गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीत येणार असून, जाताना ती वालोटीमार्गे सोडली जात आहेत. पिंपळी पूल खचल्यानंतर एमआयडीसीसह दसपटीचा संपर्क तुटला.
परिणामी, वळसा मारून पेढांबे-खडपोली या पर्यायी मार्गाचा वापर सुरू झाला असला तो रस्ता अरुंद असल्याने अवजड वाहतूक थांबली. पेढांबे आणि खडपोलीला पिंपळी पूल पुनर्बाधणीच्या निविदा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या तरी पूल होईपर्यंत एमआयडीसीतील उद्योग ठप्प होऊ नयेत यासाठी नव्याने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीत केलेल्या नियोजनानुसार, बुधवारी रात्रीपासून शिरगांव येथून पेढांबेमार्गे २० टनापर्यंतची वाहने गाणे-खडपोली एमआयडीसीत सोडण्यात आली. यापुढे रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत या मालवाहतुकीच्या वाहनांना वाहतुकीस परवानगी दिली गेली आहे.
खडपोली-पेढांबे’ रुंदीकरणाचा प्रस्ताव – खडपोली-पेढांबे रस्ता अरुंद आहे. या मार्गाचे रुंदीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अडीच कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तूर्तास साईडपट्ट्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण हाती घेतले जाणार आहे. सध्या रस्त्यालगत असलेल्या विद्युतखांबांचे स्थलांतराचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे.

