खेड शहराजवळील भरणेनाका परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. पोलीसांकडून या अपघाताबाबत पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, खेडहून कळंबणीच्या दिशेने जाणारा कंटेनर भरणे नाक्यादरम्यान आल्यानंतर महामार्गावरील रायका बाजार नजीक दुचाकीवर बसणाऱ्या दुचाकीस्वाराचा दुचाकीवर बसताना तोल जाऊन तो कंटेनरच्या चाकाखाली येऊन मृत्युमुखी पडला. या अपघाता दरम्यान कंटेनर भरधाव वेगाने जात होता. त्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शुभम शांताराम गोरीवले (वय २८, रा. वरवली गावठाणवाडी) याचा जागीच मृत्यू झाला. तर शांताराम तांबट (रा. वरवली) हा किरकोळ जखमी झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे भरणेनाक्यावर वाहतूकीची कोंडी झाली होती. परंतु स्थानिक ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी यांनी एकत्र येत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची रात्री उशीरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.