रत्नागिरी जिल्ह्याची सागरी किनारपट्टीची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी थेट मैदानात उतरून पाहणी केली. दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी मिरकरवाडा येथील जेट्टीला भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी मच्छीमारांच्या मदतीचे आवाहन केले. जिल्ह्याच्या किनारपट्टीची भौगोलिक रचना लक्षात घेता, इथली सुरक्षा व्यवस्था कायमच संवेदनशील मानली जाते. याच पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक बगाटे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून मिरकरवाडा जेट्टीवरील सर्व सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेचा आढावाच घेतला नाही, तर समुद्रातील बोटींची पाहणी करून त्यांची तपासणीही केली.
यावेळी त्यांनी मच्छीमारांशी मनम ोकळ्या गप्पा मारत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, मासेमारीसाठी बोटींवर काम करणाऱ्या खलाशांची माहिती घेऊन त्यांची नोंदणी व्यवस्थित आहे का, याचीही खात्री केली. किनारपट्टीवरील अवैध हालचाली रोखण्यासाठी पोलीस दल आणि स्थानिक मच्छीमार यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समुद्रात किंवा किनारपट्टीवर कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवण्याचे आवाहन त्यांनी मच्छीम नेपाळी ारांना केले.
नौकेतून गस्त – या उपक्रमाचा एक भाग म्हणून, पोलीस अधीक्षक बगाटे यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या नौका विभागातील जवानांसोबत सागरी गस्त केली. स्वतः नौकेत बसून त्यांनी समुद्रातील परिस्थिती आणि गस्तीची पद्धत जवळून अनुभवली. यामुळे किनारपट्टीच्या सुरक्षेची स्थिती अधिक स्पष्ट झाली. यावेळी पोलीस अधीक्षक बगाटे यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती. राधिका फडके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, जिल्हा सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन भोईर तसेच नौका विभागाचे पोलीस अंमलदार उपस्थित होते.