HomeChiplunसामंजस्य कराराच्या अटीमुळे 'साफयिस्ट'चे कामगार अडचणीत

सामंजस्य कराराच्या अटीमुळे ‘साफयिस्ट’चे कामगार अडचणीत

बेकरी उत्पादनासाठी लागणारा यिस्ट या कंपनीमध्ये तयार करतो.

गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफयिस्ट कंपनीने आपल्या कामगारांना अचानक करार सामंजस्याचा करण्याची सूचना केली. त्या विरोधात आज सर्व कामगार कंपनीच्या गेटवर जमले. प्रशासनाने मध्यस्थी करून पाच दिवसांची मुदत कंपनीकडून घेतली. त्यानंतर या विषयावर तोडगा निघाला. आमदार शेखर निकम यांनी यासाठी पुढाकार घेतला. कंपनीने शुक्रवारी अचानक सात कंत्राटदार आणि वाहतूकदारांना कंपनीशी सामंजस्य करार करण्यासाठी सूचना केली. कंपनीशी करार केलेल्या कामगारांना प्रवेश दिला जाईल, असा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. शुक्रवारी रात्री अकरा वाजता हा निर्णय झाल्यानंतर कंपनीच्या या निर्णयानंतर सर्व कामगार आज सकाळी प्रवेशद्वारावर जमले होते; मात्र त्यांना कंपनीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची कंपनी व्यवस्थापनाबरोबर बैठक झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत विविध मुद्द्यांवर औपचारिक चर्चा झाली. कंपनी चालू ठेवण्यासाठी काही मार्ग सुचवण्यात आले. औद्योगिक गाणे खडपोली वसाहतीमध्ये १९८५ पासून साफयिस्ट कंपनी कार्यरत आहे.

कंपनीत केवळ २५ कामगार कायमस्वरूपी आहेत. उर्वरित दोनशे कामगार कंत्राटी आहेत. वेगवेगळ्या ठेकेदारमार्फत हे कामगार कंपनीला पुरवण्यात आले आहेत. कामगारांना ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या गाड्यासुद्धा कंत्राटी पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. दिवाळी तोंडावर असताना कंपनीतील कामगार, कंत्राटदार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये पगारवाढीवरून काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. कंपनी व्यवस्थापन कंत्राटी कामगारांना आणि कंत्राटदारांना त्यांच्या त्रुटी लक्षात आणून देत कामात सुधारणा करण्याची सूचना करत आहे. बेकरी उत्पादनासाठी लागणारा यिस्ट या कंपनीमध्ये तयार करतो. महाराष्ट्र, गोव्यासह देशाच्या अनेक भागांत ही कंपनी आपले उत्पादन पुरवते. यिस्ट तयार झाल्यानंतर दोन ते अडीच दिवसांत ते बेकरीमध्ये पोहोचणे गरजेचे असते. सध्या पिंपळी नांदिवसे रस्त्यावरील खडपोलीचा पूल खचल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे साफयिस्ट कंपनीला आपले उत्पादन वेळेत वितरकापर्यंत पोहोचवण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहेत.

कंपनी व्यवस्थापन त्रस्त – कंपनीत उत्पादन सुरू असताना तयार होणारे सांडपाणी टँकरने पश्चिम महाराष्ट्रात नेले जात होते. पूल खचल्यानंतर हे सांडपाणी नेण्यास मर्यादा आल्या आहेत. सांडपाण्याची वाहतूक करण्यासाठी ज्या एजन्सीला परवाना देण्यात आला आहे, त्या एजन्सीने यापूर्वी कामथे नदीत सांडपाणी सोडले होते. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीवर कारवाई केली होती. खडपोली परिसरातील नद्यांमध्येही हे पाणी सोडू नये, असे स्थानिकांचे मत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे कंपनी व्यवस्थापन मागील काही दिवसांपासून त्रस्त आहे.

RELATED ARTICLES

Most Popular