महावितरण कंपनीने राबविलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटर योजना ही सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या खिशावर मोठा आर्थिक बोजा टाकणारी असून वीज खाजगीकरणाचा मार्ग मोकळा करण्याचा डाव असल्याचा आरोप करत चिपळूण तालुक्यातील खेडों व पेढे जिल्हा परिषद गट महाविकास आघाडी व सर्वसामान्य जनता यांच्यावतीने मंगळवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रभात नाका, एमआयडीसी नरोड येथून निघून महावितरणच्या खेर्डी कार्यालयावर धडकणार आहे. या संदर्भात माहिती देताना युवा सेनेचे तालुका अधिकारी उमेश खताते म्हणाले की, स्मार्ट प्रीपेड मीटर मोफत असल्याची जाहिरात केली जात असली तरी प्रत्यक्षात या मीटरचा खर्च थेट ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून अल्प अनुदानदिल्यानंतर उर्वरित खर्च वीजदरवाढीच्या स्वरूपात ग्राहकांवर लादण्यात येईल. दि. १ एप्रिल २०२५ पासून लाखो ग्राहकांना वाढीव वीजदर भरून या मीटरचा खर्च परतफेड करावा लागेल.
या मीटरमुळे ग्राहक थकबाकी झाल्यास क्षणात वीज कापली जाईल आणि वीज हा मूलभूत हक्क नसून प्रीपेड रिचार्ज सारखा लक्झरी माल ठरेल, असा आयोजकांचा आरोप आहे. स्मार्ट मीटर योजना ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून वीज वितरणाचे खासगीकरण करण्याचा पाया आहे. मोफत मीटरच्या नावाखाली अब्जावधी रुपये ग्राहकांकडून वसूल आणि करण्याचा अन्यायकारक डाव रोखण्यासाठी महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही उमेश खताते यांनी केले आहे. या मोर्चाची जय्यत तयारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून सुरू असून ठिकठिकाणी बैठका घेऊन नियोजन केले जात आहे. शिवाय खेर्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर यां जनआक्रोश मोर्चाचे फलकही लावण्यात आले आहेत. यामुळे महाविकास आघाडीचा हा मोर्चा तुफान होईल, अशी अपेक्षाही श्री. खताते यांनी व्यक्त केली.