राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या चिपळूण शहर पदाधिकाऱ्यांची एक अत्यंत महत्त्वाची व तातडीची बैठक नुकतीच झाली. आगामी चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनिती निश्चित करणे आणि सक्षम नेतृत्व पुढे आणणे, या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक असा निर्णय घेण्यात आला. चिपळूणचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते रमेशभाई कदम यांच्या नावावर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. रमेशभाई कदम यांच्यासारखे मनामध्ये आहे, असा ठाम विश्वास पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केला. रमेशभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे, अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
आघाडीबाबत सकारात्मक भूमिका – या निवडणुकीच्या अनुषंगाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, शिवसेना-उ.बा.ठा आणि काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याबाबत सकारात्मक आहे अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली. स्थानिक पातळीवर योग्य समीकरणे जुळवून, विरोधी पक्षांना शह देण्यासाठी आणि नगर परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी व्यापक राजकीय आघाडी करण्याची तयारी पक्ष दाखवत आहे. निवडणुकीच्या प्रभावी तयारीसाठी आणि अचूक नियोजनासाठी या बैठकीदरम्यान पार्लमेंटरी बोर्डदेखील जाहीर करण्यात आले आहे.
पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य – रमेशभाई कदम, सुचय आण्णा रेडीज, शिरीषभाऊ काटकर, सतीश आप्पा खेडेकर, रतन पवार, सावित्रीताई होमकळस, छायाताई खातू, अजमल पटेल, भाई गुढेकर, सुरेशशेठ चिपळूणकर, हिंदुरावशेठ पवार, डॉ. रहिमत जबले, संजय तांबडे, मोहम्मद पाते, श्रीनाथ खेडेकर, अफजल कच्छी यांचा पार्लमेंट बोर्डमध्ये समावेश आहे.

