जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप पक्षाची जिल्ह्यातील आगामी नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र नगराध्यक्ष पदाचा निर्णय राखून ठेवत त्यावर ३ दिवसांत वरीष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे. परंतु महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला अशी माहिती प्राप्त झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी महायुतीतून निवडणुका लढवल्या जातील असे स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील तसे बोलून दाखवले होते.
मुंबईत बैठक – या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला केवळ शिंदेसेना-भाजप युतीचे पदाधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते. याबाबत राजकीय वर्तुळात ‘उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये विशेष म्हणजे चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या जागा वाटपासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये शिवसेनेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आग्रही राहिले. यामुळे ही जागा नेमकी कोणाच्या पारड्यात जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
चिपळूण, देवरूखवर भाजपाचा दावा मिळालेल्या माहितीनुसार – चिपळूण तसेच देवरुख नगराध्यक्ष पदाची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजप सोडण्यास तयार नाही. कारण हे दोन्ही नगराध्यक्ष पद भाजपने गेल्यावेळी स्वबळावर जिंकल्या होत्या. त्यामुळे या जागेवर भाजप तडजोड करण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदावर निर्णय राखीव ठेवण्यात आला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस या संदर्भात निर्णय घेतील. तसेच स्थानिक पातळीवर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असेही नमूद करण्यात आले. खेड नगरपरिषद बाबत मात्र कोणताही विषय चर्चेला आला नाही. त्यामुळे वैभव खेडेकर यांच्या निर्णयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
रत्नागिरीचे नगराध्यक्षपद – तसेच रत्नागिरी बाबत देखील कोणताही निर्णय या बैठकीत झालेला नाही.ना.उदय सामंत यांनी आपल्या पक्षाची बाजू लावून धरत आग्रही भूमिका घेतली होती. परंतु भाजपने हा विषय अतिशय कौशल्याने हाताळत दोनच दिवसात स्थानिक पातळीवर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
अनेकांची उपस्थिती – यावेळी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, राज्य गृहमंत्री योगेश कदम. कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, माजी, आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सुर्यकांत दळवी, सदानंद चव्हाण, सुभाष बने, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप नेते प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

