23.9 C
Ratnagiri
Friday, January 16, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeChiplunनिवडणुकांच्या रणधुमाळीत जिल्हयात राष्ट्रवादीला 'जोर का झटका', रमेशराव कदमांचा राजीनामा

निवडणुकांच्या रणधुमाळीत जिल्हयात राष्ट्रवादीला ‘जोर का झटका’, रमेशराव कदमांचा राजीनामा

राजीनामा देताना त्यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य, विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम यांनी पक्षातील सर्व पदांसह पक्ष सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला आहे. तसेच हा माझा अंतिम निर्णय असल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यांच्यासह पक्षाच्या विविध पदावर असलेले जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. राजीनामा देताना त्यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

खंदे साथीदार – खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा कोकणातून सर्व प्रथम रमेशभाई कदम यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत थेट प्रवेश केला.तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेत काही दिवसात तालुक्यात पक्ष उभा केला आणि लगेच विधानसभा. निवडणूक लढवली. अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला. परंतु न थांबता पुन्हा पक्ष वाढीसाठी काम सुरू केले. नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळवून देत पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले आणि तळ कोकणात राष्ट्रवादी पक्षाचा पहिला आमदार म्हणून ते निवडून देखील आले. या दरम्यान त्यांनी फक्त चिपळूण नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी फळी उभी करून अनेक कार्यकर्त्यांना पदे मिळवून दिली होती.

शरद पवारांचे निकटवर्तीय – पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व रमेशभाई यांचे अत्यंत जवळचे संबंध राहिले. खा. शरद पवारांनी आदेश द्यावा आणि रमेशभाईनी तो तंतोतंत पाळावा अशी गेल्या कित्येक वर्षाची समीकरणे राहिली आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि तब्बल १ लाख २८ हजार मते मिळवली होती. विशेष म्हणजे यावेळी त्यांना गुहागर, खेड, दापोली, मंडणगड या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. राष्ट्रवादीचा उमेदवार समोर असताना देखील रमेश कदमांना मिळालेली ही मते म्हणजे त्यांनी जिल्हाभरात कार्यकर्त्यांचे विणलेले जाळे किती भक्कम होते, याचा ढळढळीत पुरावा होता. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील एक बलाढ्य नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

नगराध्यक्षपदाची निवडणूक – नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला. आता हाच मुद्दा पकडत रमेशभाई कदम यांनी थेट राजीनामा दिला आहे. नगरपरिषद निवडणुकीत मी व माझे कार्यकर्ते उतरलेले असताना पक्षाने आमची कोणतीच दखल घेतलेली नाही. पक्ष नेत्यांच्या बैठका, सभा सोडाच फोन करून साधी विचारपूस देखील केली नाही. उलट पक्षाचे संपूर्ण पॅनल मी उभे केलेले असताना पक्षाचे एबी फॉर्म देण्यासाठी देखील चालढकल केली जात होती. एबी फॉर्म देताना राजकीय कारस्थान केले गेले. असा थेट आरोप रमेशभाई कदम यांनी केला आहे.

मोठा गौप्यस्फोट – काही महिन्यांपूर्वी शरद पवार साहेबांनी माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शवली, मी इच्छुक नव्हतो, परंतु शरद -पवारांचा शब्द मी तोडू शकत नव्हतो. नियुक्तीचे पत्र देण्यासाठी मला मुंबईत बोलवण्यात आले. मात्र तिथे काय घडले मला माहित नाही. अद्यापपर्यंत ते’ पत्र मला मिळालेले नाही असा गौप्यस्फोट देखील रमेशभाई कदम यांनी केला आहे. माझ्या सारख्या संस्थापक सदस्याला जर अशी वागणूक मिळत असेल, माझे खच्चीकरण केले जात असेल, पक्ष पूर्णतः दुर्लक्ष करत असेल, कार्यकर्त्यांची दखल घेत नसेल तर अशा पक्षात थांबण्यात मला अजिबात स्वारस्य नाही. असेही त्यांनी नमूद केले आहे. खा. शरद पवार यांच्यावर माझी श्रद्धा होती, आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. ते माझे दैवत आहेत, असेही आवर्जुन रमेश कदम म्हणाले.

राजीनामा पाठविला – रमेशभाई कदम यांनी पक्षाकडे राजीनामा पाठवला असून यापुढे मला पक्षाचे काम करता येणार नाही असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राजापूर ते मंडणगड पर्यंत रमेश कदम यांना मानणारा वर्ग फार मोठा आहे. अनेक कार्यकर्त्यांना पदे देऊन मोठे केले आहेत. पक्षासह अनेक संस्थानिक पदावर त्यांचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. रमेशभाई कदम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक पदाधिकारी देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे कळते. त्यामुळे रमेशभाई कदमांच्या राजीनाम्याने जिल्ह्याच्या राजकारणात काही परिणाम नक्की दिसतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुख्य म्हणजे निवडणुका तोंडावर असताना हा राजीनामा आला आहे..

RELATED ARTICLES

Most Popular