मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-शिंदेवाडी परिसरात भरधाव वेगातील इटिंगा कारने सोमवारी दुपारच्या सुमारास पुढे धावणाऱ्या वाहनांना पाठीम ागून धडक दिल्याने भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने वेगात जाणाऱ्या इटिंगा कारने सर्वप्रथम पुढे जाणाऱ्या मालवाहू महिंद्र टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेमुळे हा टेम्पो जागेवरच गोल फिरत महामार्गालगत पलटी झाला. याचवेळी टेम्पोची धडक गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो कारला बसली. त्यामुळे अल्टो कार महामार्गावरील दुभाजकावरून उडत दुसऱ्या बाजूला जाऊन कोसळली.
दरम्यान, याच इर्टिगा कारची धडक समोरून जाणाऱ्या ऍक्टिवा दुचाकीला देखील बसली. या धडकेत ऍक्टिवा दुचाकीही महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली. या भीषण अपघातात टेम्पोमधील काही प्रवासी जखमी झाले असून टेम्पोचालकाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ऍक्टिवा चालकालादेखील दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
या अपघातातील कार ही रत्नागिरी शहरातील एका नामांकित ट्रॅव्हल्स एजन्सीची असल्याची चर्चा घटत्तास्थळी सुरू होती. अपघातातील टेम्पो हा तालुक्यातील एका गावातून कार्यकर्त्यांना घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आला असल्याचेदेखील चर्चिले जात होते. उमेदवारी अर्ज दाखल करून झाल्यानंतर जेवण करून परतताना हा अपघात झाला.

