25.8 C
Ratnagiri
Tuesday, February 24, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeRatnagiriशिमग्यासाठी भेरलीमाड हवा तर 'धनेश' टिकवा

शिमग्यासाठी भेरलीमाड हवा तर ‘धनेश’ टिकवा

धनेश हा पक्षी जगातील केवळ अफ्रिका आणि आशिया या दोनच खंडात आढळतो.

धनेश हा पक्षी अनेक वर्षे जंगलाची शेती करत आहे. त्यामुळे त्याचा अधिवास वाचवणे, त्याचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शिमग्यासाठी भेरलीमाड हवा असेल तर धनेशाला टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मिश्रशेती करावी लागेल, शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीर आहे. कृत्रिम निवासस्थान, अधिवासांचे पुनर्संचयन, सामाजिक क्लब या माध्यमातून धनेश संवर्धन करावे लागेल, असे आवाहन सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी केले. वनविभाग आयोजित पक्षीमित्र संमेलनामध्ये ते ‘जंगलाचा शेतकरी’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले, ‘आहे ते राखण, नव्याने रोपण करणं, जंगल वाचवणं याला सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे. देशात नऊ प्रकारचे धनेश आढळतात, त्यातील चार प्रजाती रत्नागिरीमध्ये आढळतात. धनेश हा पक्षी जगातील केवळ अफ्रिका आणि आशिया या दोनच खंडात आढळतो. जंगलाचे आरोग्य तपासायचे असेल तर धनेशाची संख्या तपासली जाते.’धनेशामध्येही वधु-वरांचे मेळावे भरतात. त्यांचे आयुष्य ५० वर्षे असतं. एकदा जोडी ठरली की, नर मादीला आवडणारी फळे भेट देतो.

ढोलीमध्ये जायच्या आधी त्याची साफसफाई दोघे मिळून करतात. मादी आतमध्ये गेल्यानंतर ढोलीचे दार लिंपण्यासाठी वड, पिंपळ, औदुंबर अशा फळांचा पल्प वापरला जातो. मलबार पाईड हा मातीदेखील वापरून लिंपण करतो. साठ ते नव्वद दिवस मादी अंडी उबवते त्या वेळी नर मादीसाठी चार ते पाच कि.मी. परिसरात फळे गोळा करतो. सरडे, पाली, छोटे साप यामधून प्रथिने, फळांच्या माध्यमातून पाण्याची कमतरता भरून काढतो. बेहडा, चांदफळ, काजरा, काजू, उत्रंजीवा, जांभूळ, बकूळ, जंगली काजू, बीबा अशा ४८ प्रकारच्या बिया त्याच्या विष्ठेतून पाहायला मिळातात. अशा बिजांचा प्रसार १२ कि.मी. परिसरात तो करत असतो.bदरम्यान, ‘महाधनेश’ रत्नागिरी जिल्ह्याच्या वनपर्यटनासाठी प्रमुख प्रजाती घोषित केली. त्याचा फायदा धनेश संवर्धनाला होणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करणेही शक्य होईल, असा विश्वास पक्षिमित्रांकडून व्यक्त केला जात आहे.

‘सुसंस्कृत गिधाड’ने जिंकली प्रेक्षकांची मने – वन्यवाणी फाउंडेशन प्रस्तुत आणि कुणिका बनसोडे-सावंत निर्मित ‘सुसंस्कृत गिधाड’ या नाटकाने संमेलनाची सांगता झाली. मकरंद सावंत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाने गिधाडांचे महत्त्व अधोरेखित केले. रामायणातील जटायूचा संदर्भ देत गिधाड हे शिकार न करता केवळ मृत प्राण्यांवर आपली उपजीविका करतात आणि पर्यायाने पर्यावरणाचे ‘स्वच्छतादूत’ म्हणून काम करतात, हा मोलाचा संदेश यातून देण्यात आला. डायक्लोफिनॅकच्या वापराने मृत जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडांची संख्या कमी होत आहे.

रत्नागिरीत पक्ष्यांची विविधता – ‘सागरी आणि स्थलांतरित होणारे रत्नागिरीतील पक्षी’ या विषयावर विराज आठल्ये यांनी सविस्तर माहिती दिली. खरूची, उलटचोच तुतारी, सामान्य टिलवा, गळाबंद पानलावा, पानटिलवा, तणमोर, संघचारी टिटवी, छोटा चिखला अशा विविध पक्ष्यांबाबत चित्रफीत आणि छायाचित्रामधून माहिती दिली तसेच ‘रत्नागिरीतील पक्ष्यांची विविधता’ या विषयावर निकिता शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने देवराई, पाणथळ जागी आढळणाऱ्या खंड्या, पानकावळा, वटवट्या अशा कितीतरी पक्ष्यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES

Most Popular