रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या थेट जगण्याशी जोडलेल्या केरोसीन (घासलेट) आणि रेशन धान्य वितरण व्यवस्थेमध्ये सध्या मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासकीय त्रुटी आणि व्यावहारिक अडचणींमुळे रेशन दुकानदार कमालीचे अडचणीत आले असून, त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी ‘रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक/मालक संघटनेने’ आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात धाव घेतली असून, त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
केरोसीन वितरणातील आर्थिक पेच काय आहे? शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत सध्या केरोसीन वितरणाची नवीन प्रक्रिया राबवली जात आहे. नियमांनुसार, हे केरोसीन थेट रेशन दुकानांपर्यंत पोहोचवणे आणि सर्व शिधापत्रिकाधारकांना (कार्डधारकांना) ते उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, प्रशासनाकडून केरोसीनचा पुरवठा होण्यापूर्वीच दुकानदारांना त्याचे बिल तातडीने भरण्याची सक्ती केली जात आहे. “अनेक रेशन दुकानदारांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, ग्राहकांना केरोसीन विकण्यापूर्वीच स्वतःच्या खिशातून एवढी मोठी रक्कम भरणे त्यांना अशक्य होत आहे,” असे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे केरोसीनचे वितरण झाल्यानंतरच त्याची रक्कम प्रशासनाकडे जमा करण्याची सवलत मिळावी, अशी व्यावहारिक मागणी दुकानदारांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास जिल्ह्यातील दुकानदार केरोसीन वितरणावर बहिष्कार टाकतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
तीन महिन्यांच्या धान्य वाटपात तांत्रिक खोडा दुसरीकडे, राज्य सरकारच्या आदेशानुसार एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य लाभार्थ्यांना एकत्रितपणे वाटप करण्याचे काम सध्या सुरू आहे. रेशन दुकानदार ‘पॉज’ (POS) मशीनद्वारे हे धान्य वाटप करत आहेत. परंतु, अनेक गोदामांमध्ये वेळेत धान्यच उपलब्ध न झाल्यामुळे हजारो गरीब कार्डधारक अद्यापही धान्यापासून वंचित आहेत.
याहून मोठी अडचण म्हणजे, पॉज मशीन प्रणालीवरून एप्रिल महिन्याचा धान्य साठा अचानक गायब (डिलिट) करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना तांत्रिक कारणांमुळे एप्रिलचे धान्य मिळाले नव्हते, त्यांना आता उर्वरित महिन्यांचे धान्य देताना मशीनवर अडचणी येत आहेत. हा तांत्रिक घोळ मिटवण्यासाठी एप्रिल महिन्याचा साठा ऑनलाइन प्रणालीवर पुन्हा ‘कॅरी फॉरवर्ड’ (पुढील महिन्यांसाठी जोडणे) करावा, जेणेकरून गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे तीन महिन्यांचे धान्य एकत्र मिळू शकेल, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
दुकानदारांवर आर्थिक संकट; कमिशन रखडले रेशन दुकानदारांनी ग्राहकांपर्यंत धान्य पोहोचवण्याचे आपले काम प्रामाणिकपणे पूर्ण केले असले, तरी त्यांना शासनाकडून मिळणारे धान्य वितरणाचे कमिशन गेल्या काही महिन्यांपासून मिळालेले नाही. हक्काचे कमिशन रखडल्यामुळे रेशन दुकानदारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांना आपली दुकाने चालवणे आणि कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. हे थकीत कमिशन प्रशासनाने तात्काळ अदा करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या सर्व गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निवेदनाची प्रत पाठवून तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. आता जिल्हा प्रशासन यावर काय तोडगा काढते आणि सामान्य जनतेला रखडलेले धान्य कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

