रत्नागिरी: रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथील साईनगर परिसरात घडलेल्या सुरज झोरे खून प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली होती. या अत्यंत निर्घृण आणि अंगावर काटा आणणाऱ्या हत्याकांडाच्या पोलीस तपासात आता रोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट म्हणजे, ज्या तरुणीसाठी हा सगळा रक्तरंजित थरार घडला आणि जी घटनेनंतर अचानक गायब झाली होती, ती मुख्य संशयित तरुणी अखेर पोलिसांच्या हाती लागली आहे. ती मुंबईत लपून बसल्याचे उघड झाले असून, रत्नागिरी पोलिसांनी तिला चौकशीसाठी तात्काळ हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
“त्याच्यावर भरवसा ठेवू नकोस”; सुरजच्या एका विधानाने घेतला त्याचा बळी! २१ मे रोजी कुवारबाव येथील साईनगर परिसरात भरदिवसा सुरज झोरे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सोहम एकनाथ म्हात्रे (वय १८), अभिषेक देवानंद राठोड (वय २२) आणि नजीबुल हसीबार शेख उर्फ सोनू (वय २१) या तिघांना आधीच अटक केली आहे. पोलिसांनी जेव्हा या आरोपींची कसून चौकशी केली, तेव्हा समोर आलेले खुनाचे कारण ऐकून पोलीसही थक्क झाले.
मृत सुरज झोरे याने मुख्य आरोपी सोहम म्हात्रेच्या मैत्रिणीला एक सल्ला दिला होता. सुरज तिला म्हणाला होता, “तू सोहमवर जास्त भरवसा ठेवू नकोस.” सुरज आपले मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची हीच गोष्ट त्या मुलीने सोहमच्या कानावर घातली. हे ऐकताच सोहमचा राग अनावर झाला आणि केवळ ‘मैत्रिणीला फितवण्याचा प्रयत्न करतोय’ या संशयातून त्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने सुरजला संपवण्याचा पूर्वनियोजित कट रचला.
मैत्रिणीच्या डोळ्यांदेखतच थरारक पाठलाग करून कोयत्याने वार! गुन्ह्याच्या दिवशी सोहम म्हात्रेची ती मैत्रिण रत्नागिरीत आली होती आणि ती या तिन्ही आरोपींसोबतच फिरत होती. ती सोबत असतानाच या आरोपींनी सुरज झोरेला गाठले. त्यानंतर त्या तरुणीच्या डोळ्यांदेखतच सोहम आणि त्याच्या साथीदारांनी सुरजवर धारदार कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली.
मानेवर आणि हातावर झालेले गंभीर वार झेलत सुरज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने तिथून पळत सुटला. पळता पळता त्याने शेजारील एका घराच्या कंपाउंडमध्ये उडी मारली. मात्र, रक्ताने माखलेल्या आणि अंधाधुंद झालेल्या तिन्ही आरोपींनी त्याचा पाठलाग सोडला नाही. त्यांनी कंपाउंडमध्येच सुरजला गाठून तिथेच त्याचा अत्यंत निर्घृणपणे खेळ खलास केला.
मुंबईत गायब झालेली तरुणी पोलिसांच्या रडारवर! या भीषण हत्याकांडानंतर सोहमची ती मैत्रिण अचानक रत्नागिरीतून गायब झाली होती, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. रत्नागिरी शहर पोलिसांनी सायबर सेल आणि तांत्रिक मदतीने तिचा शोध सुरू केला असता ती मुंबईत असल्याचे निष्पन्न झाले.
या हत्येमध्ये त्या तरुणीचा नेमका काय सहभाग होता? तिने सोहला सुरजविरुद्ध चिथावणी दिली होती का? की ती केवळ मूकदर्शक होती? या सर्व प्रश्नांचा उलगडा तिच्या चौकशीनंतरच होणार आहे. दरम्यान, या खुनासाठी वापरलेला मुख्य गुन्हाशस्त्र म्हणजेच तो रक्ताळलेला ‘कोयता’ पोलिसांनी हस्तगत केला आहे.
नातेवाईकांकडून गुन्हा दाखल, पोलीस तपास वेगात या प्रकरणी मुंबईतील दहिसर येथील रहिवासी आणि मृत सुरजची नातेवाईक नंदा फाले यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा आणि आर्म्स अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक आणि त्यांची गुन्हे शोध मोहीम (DB) टीम या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने करत आहे.

