रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी पावसाने चांगलच झोडपल असून, त्यामुळे काही भागांमध्ये चांगलाच फायदा झालेला जाणवत आहे. खेड तालुक्यातील धरणं यंदा मागच्या वर्षीच्या मानाने भरपूर पाऊस पडल्याने १०० टक्के भरली आहेत. धरणं १०० टक्के भरून वाहू लागल्याने दरवर्षी तालुक्याला भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात तरी कमी होण्याची शक्यता आहे. तहसीलदार कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार खेड तालुक्यात यंदा १ जून ते २५ सप्टेंबर दरम्यान ४२३०.२० मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी अधिक पावसाची नोंद झालेली आहे.
तालुक्यामध्ये शेलारवाडी, कोंडिवली,नातूवाडी, खोपी, पोयनार, शिरवली, तळवट, न्यू मांडवे ही धरणे आहेत. या धरणांपैकी पोयनार आणि न्यू मांडवे ही धरणे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने, या धरणांमध्ये पाणी साठा अजून केला जात नाही. अन्य धरणांमध्ये मात्र पाणीसाठा केला जातो. त्यामध्ये सुद्धा नातूवाडी आणि शिरवली या दोन धरणाच पाणी फक्त सिंचनासाठी वापरले जाते इतर कोणत्याही नाही. कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने या धरणांच्या पाण्यावर शेतकऱ्यांना दुबार पिक घेता येत नाहीत. परंतु, यावर्षी धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा जमा झाल्याने निदान टंचाईच्या काळात धरणातील पाण्याने ग्रामस्थांची तहान भागवणे तरी शक्य होऊ शकते.
त्याचप्रमाणे शिरवली धरणातही पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असल्याने, या धरणातील पाण्यावर काही गावांमध्ये दुबार पिकं घेतली जातात, तर काही ग्रामस्थांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. पोयनर आणि न्यू मांडवे या धरणांची कामे सुद्धा जर ठराविक वेळेमध्ये पूर्ण झाली असती तर, पाणी साठा होऊन अन्य काही गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न सुटला असता आणि त्यांना देखील दुबार पिकांचा लाभ घेता आला असता.