सावर्डे (चिपळूण): संसारात एकमेकांना साथ देण्याऐवजी किरकोळ पैशांच्या हव्यासापोटी पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याची एक चीड आणणारी घटना चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे उघडकीस आली आहे. दुकानात नवीन माल भरण्यासाठी माहेरहून २५ हजार रुपये आणण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली, इतकेच नव्हे तर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याची धमकीही दिली. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे कासारवाडी येथील रहिवासी उभयचंद आत्माराम मोहिरे (वय ३८) याचे दुकान आहे. १५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास उभयचंद याने आपली पत्नी पल्लवी मोहिरे (वय ३५) यांच्याकडे पैशांची मागणी केली. “दुकानात नवीन माल भरायचा आहे, त्यामुळे तुझ्या आईकडून तातडीने २५ हजार रुपये घेऊन ये,” असा तगादा त्याने लावला. मात्र, आधीच घरची परिस्थिती आणि वारंवार होणारी मागणी लक्षात घेता पल्लवी यांनी माहेरहून पैसे आणण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
अमानुष मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
पैसे आणण्यास नकार मिळताच उभयचंदचा राग अनावर झाला. त्याने पत्नीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात त्याने पल्लवी यांच्या दोन्ही कानशिलात लगावून त्यांच्या डोक्यावर ठोशांनी जोरदार प्रहार केले. वाद एवढ्यावरच थांबला नाही; घरात पडलेले लाकडी दांडके उचलून त्याने पल्लवी यांच्या डाव्या कुशीवर आणि उजव्या गुडघ्यावर जबर मारहाण केली.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पल्लवी गंभीर जखमी झाल्या. मारहाण करताना, “तुला आता जिवंत ठेवत नाही, तुझ्या अंगावर थेट पेट्रोल ओतून जाळून खाक करून टाकेन,” अशी थरकाप उडवणारी धमकीही उभयचंदने दिली.
सावर्डे पोलिसांत गुन्हा दाखल
पतीच्या या हिंसक कृत्याला न घाबरता, जखमी अवस्थेत पल्लवी मोहिरे यांनी सावर्डे पोलीस ठाणे गाठले आणि पतीविरोधात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी आरोपी पती उभयचंद आत्माराम मोहिरे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास सावर्डे पोलीस करत आहेत.

