मांसाहारी जेवणाची आवड असणाऱ्या आणि आरोग्यासाठी रोजच्या आहारात ‘प्रोटिन डाएट’ घेणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची व चिंतेची बातमी समोर येत आहे. आगामी डिसेंबर महिन्यापर्यंत अंडी आणि चिकनच्या किमतींमध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, कोंबड्यांच्या खाद्याच्या (पोल्ट्री फीड) दरात झालेली विक्रमी वाढ या दरवाढीमागील मुख्य कारण ठरत आहे.
दरवाढीमागची मुख्य कारणे: मका आणि तांदूळ झाले महाग
बॉयलर कोंबड्यांच्या रोजच्या खाद्यामध्ये मका आणि भरड (तुटलेला) तांदूळ यांचा वापर मोठ्या प्रमाणावर (सुमारे ५५ ते ६५ टक्के) केला जातो. मात्र, गेल्या काही कालावधीत या दोन्ही अन्नधान्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत:
-
मक्याच्या दरात तिप्पट वाढ: गेल्या वर्षी जो मका अवघ्या १८ रुपये प्रति किलोने मिळत होता, तो यंदा थेट ३४ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. महिन्याभरापूर्वी २६ ते २७ रुपये असलेला हा दर डिसेंबरपर्यंत ४० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
-
भरड तांदळाचे दरही वाढले: १४ ते १५ रुपये प्रति किलोने मिळणारा भरड तांदूळ आता वाढून ३१ ते ३२ रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत अप पावसामुळे मक्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. देशात खरीप मक्याचे उत्पादन १५ ते १६ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. याशिवाय, इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा वाढता वापर आणि व्यापाऱ्यांकडून होणारी साठेबाजी यामुळे पोल्ट्री उद्योगासाठी धान्याची उपलब्धता वेगाने कमी होत आहे.
हिवाळ्यात मागणी वाढणार, पण उत्पादनात घट
थंडीच्या मोसमात, विशेषतः नाताळ (ख्रिसमस) आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या काळात अंडी आणि चिकनला नेहमीच प्रचंड मागणी असते. परंतु, यावर्षी पोल्ट्री उत्पादनात २० टक्क्यांहून अधिक घट होण्याचा अंदाज असल्याने बाजारातील गणित बिघडणार आहे:
-
अंडी: सध्या घाऊक बाजारात ६ ते ७ रुपये प्रति नग मिळणारे अंडे डिसेंबरपर्यंत ७ ते ८ रुपये प्रति नग होण्याचा अंदाज आहे.
-
चिकन (Skinless): सध्या २२५ ते २५० रुपये प्रति किलो मिळणारे चिकन थेट २६० ते २७५ रुपये प्रति किलोवर पोहोचू शकते.
हे अंदाज प्रामुख्याने घाऊक बाजारातील स्थिती दर्शवतात; त्यामुळे स्थानिक दुकाने आणि किरकोळ बाजारात याचे दर आणखी जास्त असू शकतात. परिणामी, आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडण्याची दाट शक्यता आहे.

