रत्नागिरी: रविवारच्या सुट्टीचा दिवस, हातात बॅट-बॉल आणि मैदानात मित्रांसोबत रंगलेला क्रिकेटचा सामना… अशा आनंददायी आणि उत्साही वातावरणात एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. रत्नागिरी तालुक्यातील चवंडेवठार येथील लक्ष्मी चौकात अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना एका अवघ्या ३५ वर्षीय तरुणाचा अचानक भोवळ येऊन जमिनीवर कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. स्मित नरेंद्र चवंडे (वय ३५, रा. चवंडेवठार, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव असून, या अनपेक्षित घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
सामना सुरू असतानाच चक्कर आली अन्…
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी स्मित चवंडे हे गावातील स्थानिक मित्रांसोबत नेहमीप्रमाणे चवंडेवठार येथील लक्ष्मी चौकात अंडरआर्म क्रिकेटचा सामना खेळत होते. मैदानावर खेळाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच अचानक स्मित यांना तीव्र चक्कर आली आणि ते थेट जमिनीवर बेशुद्ध होऊन कोसळले.
क्षणार्धात घडलेल्या या घटनेने मैदानावरील मित्रांमध्ये एकच खळबळ उडाली आणि मोठा गोंधळ निर्माण झाला. सोबत खेळत असलेल्या युगेश सावंत यांनी विलंब न करता तातडीने स्मित यांचे बंधू सुशांत चवंडे यांना दूरध्वनीवरून घडल्या प्रकाराची माहिती दिली.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
घटनेची वार्ता समजताच कुटुंबीय आणि मित्रांनी तातडीने धाव घेत स्मित यांना उपचारासाठी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील परकार हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. अवघ्या ३५ व्या वर्षी तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
या दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत आहेत. ऐन उमेदीच्या काळात स्मित यांचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्यामुळे क्रीडाप्रेमींसह संपूर्ण चवंडेवठार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

