जगामध्ये कुख्यात अंडर वर्ल्ड डॉन म्हणून प्रसिद्ध असलेला दाऊद इब्राहिम हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या मुंबके या गावचा आहे. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे महारष्ट्र पोलीस दलामध्ये होते. मुंबके येथे त्याच्या वडिलांनी १९७९-८० च्या दरम्यान घर बांधले होते. दाऊदचे कुटुंब केवळ सुट्टीसाठी गावी येत असून, तेव्हा या घरामध्ये ते वास्तव्य करत होते. तळमजला आणि त्यावर दोन माळे असलेल्या या घरात सद्यस्थिती कोणीही राहत नसल्याने दाऊदचे हे घर ओसाड पडले होते.
केंद्र सरकारच्या स्मगलर फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स ऍक्ट ऑथॉरिटीस ने दाऊद इब्राहिम याची मालमत्ता जप्त करून त्या मालमतेचा लिलाव ठरविला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मुंबके येथील घराच्या झालेल्या लिलावामध्ये दिल्ली स्थित ऍड. श्रीवास्तव यांनी त्याची खरेदी करून आता तिथे सनातन स्कूल सुरु करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. श्रीवास्तव यांच्या या निर्णयामुळे ज्या घराच्या भिंतींना या आधी अंडरवर्ल्डच्या घडामोडी ऐकण्याची सवय होती त्या भिंती आता सनातन संस्कृतीचे धडे गिरवणार आहेत.
ऍड. श्रीवास्तव यांनी बऱ्याच महिन्यांपासून पडून राहिलेली हि मालमता आता उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या घरामध्ये आधी दाऊद इब्राहिमचे कुटुंब वास्तव करत होते, त्या घ्रराचे नाव सुद्धा आता बदलण्यात आले आहे. त्या घराला नवीन नाव चित्रगुप्त भवन असे नाव देण्यात आले आहे. आणि येत्या काही दिवसातच या घरामध्ये सनातन धर्म पाठशाळा ट्रस्टचे गुरुकुल सुरु करण्यात येणार आहे.
ऍड. श्रीवास्तव यांच्या अचूक आणि शिक्षणाभिमुख निर्णयामुळे खेड तालुक्यामध्ये शिक्षणाचे आणखी एक दालन उघडणार आहे.