लोटेमध्ये सीईटीपीने उभारलेल्या राज्यातील पहिल्या हवा प्रदूषण निरीक्षण यंत्रणेच्या उद्घाटनानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी नाणार प्रकल्पाबद्दल विचारले असता, ते पुढे म्हणाले की, नाणारच्या लोकांना तेथे प्रकल्प व्हायला नको आहे, त्यामुळे ते कायम विरोध करत आहेत. त्यांनी केलेला विरोध शिवसेनेने मान्य केला असून, तोच रिफायनरी प्रकल्प इतरत्र लोकांना हवा असेल तर त्याबद्दल सरकार नक्की सकारात्मक विचार करेल.
जसे नाणारला स्थानिक जनतेने कायम विरोध दर्शविला आहे प्रकल्प नको म्हणून, तसे स्थानिक जनतेकडूनच प्रकल्पाची सकारात्मक मागणी असेल तर त्याचा सरकार नक्कीच विचार करेल. नाणार आता प्रोजेक्टच्या जागेच्या यादीतून कमीच झाले आहे, मात्र बारसू परिसरातील ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्पाची मागणी केली आहे. त्यानुसार स्थानिक जनतेशी आणि कंपनीशी सर्वांगाने चर्चा केली जाणार आहे.
रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक जनता जर सकारात्मक असेल तर सरकार रिफायनरीचा नक्की विचार करेल, असे महत्वपूर्ण सूचक विधान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी लोटे येथे एका कार्यक्रम प्रसंगी केले. त्याचबरोबर लोटेतील कोका कोला प्रकल्पाचे कामाला देखील लवकरच आरंभ होणार असून नजीकच्या काळामध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी प्रकल्पांना विरोध होत असेल तेथे आम्ही तो जबरदस्तीने लादत नाही. मात्र स्थानिक जनतेचीच जर प्रकल्प सुरु करण्याची मागणी असेल, सगळ्यांचा पाठिंबा असेल तर हा प्रकल्प होऊ शकतो असेही ते म्हणाले. आणि बारसुला एमआयडीसीने अधीसूचना काढून काही जमीन अधीग्रहीत करण्याची प्रकिया सुरू केलेली आहे. त्याठिकणी रिफायनरी प्रकल्प येण्याचा निर्णय झाला तर त्या ठिकाणच्या भूसंपादनाचा फायदा होऊ शकतो.