मागील काही महिन्यांपासून व्हायरल झालेल्या कथित रेकोर्डिंग क्लिप प्रकरणावरून शिवसेनेचेरामदास कदम चर्चेत आले होते. दसरा मेळाव्याला सुद्धा त्यांची जाणवलेली अनुपस्थिती त्यामुळे अनेक तर्कवितर्क काढण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनी रामदास कदम यांनी बुधवारी शिवतीर्थ वर जात त्यांना अभिवादन केले.
मंत्री अनिल परब यांच्या विरोधात रामदास कदम यांनीच पुरावे दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाल्यानंतर रामदास कदम यांच्या विरोधात नाराजी पसरली होती. पण बुधवारी माध्यमांसमोर रामदास कदम यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
रामदास कदम म्हणाले की, येत्या काही दिवसांमध्येच मी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे. माझी बाजू मांडताना अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट होणार आहे. माझ्या विरोधातील बातम्या कुठून येतात, खलबते कुठे रचली जातात, यामागे कोणाचा कट आहे. हे सर्व मला माहिती आहे. मी कडवट शिवसैनिक असून भगव्याची साथ मी कधीही सोडणार नाही असं त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे रामदास कदम नक्की कोणाच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
त्याचप्रमाणे, आज बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी त्यांच्या आठवणी जागवून त्यांनी आवर्जून सांगितले कि, केवळ बाळासाहेबांमुळेच आज मराठी माणूस सर्वत्र ताठ मानेने जगतो आहे. आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना बाळासाहेबांनीच मोठे केले, असेही रामदास कदम म्हणाले आहेत. त्या कथित क्लिप प्रकरणानंतर रामदास कदमांबद्दल अनेक प्रकारच्या अफवा पसरत होत्या, त्यामध्ये विशेष म्हणजे रामदास कदम शिवसेना सोडणार असल्याचीही चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यावर कदमांनी स्पष्टीकरण देऊन विरोधकांची तोंड बंद केली आहेत.