हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्र आणि आसपासच्या भागामध्ये पावसाचा यलो अॅलर्ट जारी केला आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला यलो अॅलर्ट जारी करण्यात आला असून त्याप्रमाणे मुंबई, पुणेसह कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात ३ डिसेंबरपर्यंत कमी प्रमाणात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता असल्याचा इशारा आयएमडीनं दिला आहे. अधिकाऱ्यांनी अवकाळी पाऊस पुढील काही दिवस कमी अधिक प्रमाणात परंतु, कायम राहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.
अरबी समुद्रामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात आज मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, धूळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. वातावरण बदलाचे परिणाम वांरवार दिसून येत आहेत. गेल्या दशकभरातील आकडेवारीचा विचार केला असता नोव्हेंबर महिन्यातील पावसाचं प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रझ येथील पर्जन्यमापकामध्ये सरासरी २४.७ मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दक्षिण किनारपट्टीवर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकण्याच्या शक्यतेने कोकण किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस यामध्ये सातत्यता राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर १ आणि २ डिसेंबर पावसाचा जोर कायम राहणार आहे. या दोन्ही दिवशी हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.