अनेक पर्यटक कोरोना काळानंतर दिलासा म्हणून अनेक जण ग्रुपने पर्यटन स्थळी जाण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जवळच आणि मज्जा मस्ती करायला गोवा राज्यात अनेक जण विकेंडला जाणे पसंत करतात. असेच सातारा येथील काही मंडळी जीवाचा गोवा करण्यासाठी गेली असता, दारूच्या नशेत घातलेल्या धिंगाण्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सातारा येथील दहा ते बारा पर्यटकांना गोवा-पेडणे येथे स्थानिकांना मारहाण करुन पळणाऱ्या दाणोली-बावळाट तिठयावर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस व सावंतवाडी पोलिसांनी सापळा रचून पकडले व त्यांना गोवा पेडणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मारहाणीचा प्रकार काल सायंकाळी पेडणे येथे साडे तीनच्या सुमारास घडला होता.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सातारा येथील पंधरा पर्यटक चार खाजगी गाड्या घेऊन मौज करण्यासाठी काल गोवा येथे आले होते. दिवसभर मौजमजा करून झाल्यानंतर ते माघारी जात होते. पेडणे येथे आले असता त्यांनी रस्त्यावरच गाडी पार्क करून मद्य प्राशन करण्यास सुरुवात केली. यावेळी स्थानिक पेडणे ग्रामस्थानी त्यांना रोकले आणि स्थानिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यास विरोध दर्शविला. आणि रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेली वाहने देखील व्यवस्थित पार्क करण्यास सांगितले. मात्र यावरून स्थानिक ग्रामस्थ तसेच त्या पर्यटकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालीच, या वाढलेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले.
दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. शिवाय गाड्यांवर दगडफेक करून नुकसानही करण्यात आले. त्या पर्यटकांनी मारहाण करून आपल्या गाड्या घेऊन तेथून पलायन केले. या घटनेची माहिती पेडणे ग्रामस्थांनी पेडणे पोलिसांना त्वरित दिली. त्यामुळे बाहेरून आलेल्यांच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी पेडणे पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग पोलिसांनी सापळा रचून त्या सर्वांना ताब्यात घेतले.