खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात आज पुन्हा एकदा मृत मगर आढळून आली असल्याने जगबुडी नदीपात्रातील जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा इथे एक मगरीचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले होते. १५ दिवसाच्या फरकाने अजून एक मगर मृतावस्थेत आढळल्याने, जगबुडी नदीपात्रातील जलचरांचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चर्चिले जात आहे.
गेल्या वर्षीही जगबुडीमध्ये नदीत एका पाठोपाठ चार मगरी मृत झाल्या होत्या, त्यामुळे जगबुडी खाडीत वारंवार होणाऱ्या मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण काय? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडला आहे. जगबुडी नदीपात्रात मगरीचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले होते. मगरीच्या पिल्लाचा मृत्यू नेमका कशामुळे ओढवला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक पर्यावरण प्रेमींनी नदीपात्रात होणाऱ्या जलप्रदुषणामुळे मगरी मृत होत असल्याचा निष्कर्ष काढत मगरी मृत होण्याचे खापर लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांवर फोडण्यात आले होते.
जगबुडी नदीपात्रात असलेल्या मगरींचा मृत्यू नेमका कशामुळे होतो याचा वनविभागाने शोध घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही मगरींचा मृत्यू होण्यामागचे नेमके कारण काय हे शोधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १५ दिवसात नदीपात्रात अजून एक मगर मृतावस्थेत आढळल्याने पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.
देवणे डोहामध्ये मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर आहे. त्यामुळे या ठिकाणी क्रोकोडाईल पार्क बनविण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी ९ कोटी रुपयांचा निधीही नगरविकास मंत्रालयाने मंजूर केला आहे. काही महिन्यातच या प्रकल्पाच्या कामाला सुरवात होणार आहे. मात्र नदीपात्रातील मगरी एकामागून एक मृत होऊ लागत असल्याने या प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा डोहामध्ये मगरींचा संचार असेल ना! असा प्रश्न विचारला जात आहे.