देवरुख शहरातील महाडिक स्टॉप येथील गादी कारखान्याला शनिवारी दुपारी १.३० वाजता आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिक धावून आले. आगीमध्ये कापूस मशिनरी व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. लाखो रुपयांचे नुकसान या आगीत झाले आहे. सुक्राम मिसाद मूळ रा. उत्तरप्रदेश यांच्या मालकीचा हा गादी कारखाना आहे.
गेली २० वर्षे देवरूखमध्ये ते वास्तव्य करत आहेत. देवरुख शहरात अग्निशमन दलाची पुन्हा एकदा कमतरता जाणवली असून नगर पंचायतीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यावेळी आग लागली तेंव्हा मिसाद यांची पत्नी व मुले कारखान्यामध्येच होती. कारखान्यामध्ये कापूस आणि कापड असल्याने आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. आग लागल्याचे समजताच मिसाद कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. ही घटना निदर्शनास येताच दत्तनगर येथील युवकांसह अन्य नागरिकांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे अर्ध्या तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीमुळे मिसाद यांचे दुकानातील कापूस व मशिनरी जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच संसारोपयोगी वस्तू सुद्धा आगीत जळून खाक झाल्या आहेत. शासनाकडून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
आग लागली असता ती विझविण्यासाठी अग्निशामक दलाची अत्यंत आवश्यकता असते. आज अग्निशामक बंब असता तर, वेळीच आग विझवली गेली असती तर आज लाखोचे नुकसान झाले नसते. गेली अनेक वर्ष नागरिक मागणी करत असून देखील देवरुख मध्ये अग्निशामक दलाची व्यवस्थाच नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे देवरूख नगरपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी याकडे गंभीरतेने लक्ष घालणे गरजेचे आहे.