30.9 C
Ratnagiri
Friday, December 13, 2024
HomeRatnagiriकोकणातील पर्यटन, उद्योग वाढीसाठी रत्नागिरी विमानतळ सुरु होणे गरजेचे – मुख्यमंत्री

कोकणातील पर्यटन, उद्योग वाढीसाठी रत्नागिरी विमानतळ सुरु होणे गरजेचे – मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणारी हि विमानसेवा कोकणच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरणार

रत्नागिरी विमानतळ विकासाबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.  रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठीच्या पायाभूत सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याअनुषंगाने विमानतळाच्या परिसरातील विकास कामांचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

सदर बैठकीस परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विमानचालन संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह,  सामान्य प्रशासन विमानचालन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे,  महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील,  संबंधित तटरक्षक दलाचे अधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोकणातील पर्यटन आणि उद्योग-व्यवसायवाढीकरिता रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु होणे गरजेचे आहे. या ठिकाणाहून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांसाठीचे नियोजन करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक निधीची उपलब्ध करून देण्यात येईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणारी हि विमानसेवा कोकणच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. परब यांनी पर्यटन व उद्योग वाढीसाठी रत्नागिरीतून विमानसेवा सुरु होणे हे महत्त्वाचे पाउल ठरणार आहे. त्याचा विस्तार आणि विकास यासाठी नियोजन सुरु असल्याची माहिती दिली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी नुकतीच या विमानतळ परिसराची संबंधित अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन, तेथील पायाभूत सुविधांसाठी आवश्यक अशी पाहणी केल्याचे तसेच स्थानिकांशी चर्चा मसलत केल्याचे सांगितले. प्रथम विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. कपूर यांनी रत्नागिरी विमानतळाचा विकास व विस्ताराच्या अनुषंगाने जमिनीचे भूसंपादन, विस्तार कामे, विविध सुविधा तसेच आवश्यक निधी याबाबत आवश्यक असणारी माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनीही विमानतळ परिसरातील प्रगतीपथावरील कामांची माहिती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular