तौक्ते वादळामध्ये रत्नागिरीच्या आसपासच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी कोल्हापूर हायवेवर हे नाणीज गाव लागते. सद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या कीर्तीमुळे हे गाव अख्ख्या जगामध्ये ज्ञात आहे. पण आज चर्चा आहे ती नाणीज गावच्या कार्यशील सरपंच गौरव संसारे यांची.
आधी कर्तव्य गावाचे, मग कुटुंबाचे या अद्ययावत म्हणीची उक्ती या तौक्ते वादळाच्या वेळी नाणीजच्या ग्रामस्थांनी अनुभवली. नाणीज सरपंच गौरव संसारे यांचा आंबा व्यवसायाचा सुद्धा व्यवसाय असून, ऐन हंगामात आलेल्या या तौक्ते वादळामुळे पूर्ण हंगामाची आणि फळांची नासधूस झाली. बागेतील १०० पेटी तयार आंबा या वादलाम्ध्ये खराब झाल्याने मोठ्या नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागले. परंतु, व्यवसायामध्ये झालेली हानी बाजूला ठेवून प्रथम गावाप्रती असलेल्या कर्तव्याने त्यांना पछाडले.
वादळाच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून गावाच्या सुरक्षेखातीर आपल्या काही सहकार्यांसह ते रात्री १० वाजेपर्यंत गावामध्ये पाहणी करत होते. हायवे असल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात जुनी उंच झाडे आहेत. काही झाडे अगदी जुनी असल्याने वादळ वाऱ्याच्या जोराला ती तग धरू शकली नाहीत. वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून स्वत: सक्रीय सहभाग घेऊन काही झाडांची तोडणी तर काही झाडे रस्त्यातून बाजूला केली. गावातील प्रत्येक कुटुंबाची चौकशी ते आपुलकीने करून, काही मदत हवी असेल तर त्याना त्वरित मदत करायला पुढाकार घेत होतेत.
मागच्याच आठवड्यामध्ये त्यांचे आजोबा दत्तू संसारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नाणीज हायस्कूलच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. परंतु, या आजोबांच्या जाण्याने त्यांच्या आंबा व्यवसायाचे नियोजन बिघडले, आणि आंबा विक्री न करता आल्याने, आंबा तसाच बागेमध्ये पाडून राहिला. आणि वादळामध्ये सुद्धा आंबे पडून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. परंतु या वैयक्तिक नुकसानीकडे दुर्लक्ष करून त्यांनी गावाच्या उपयोगी पडण्याला प्रथम प्राधान्य दिले. गावकर्यांना वेगाने मदतकार्य करण्यासाठी त्यांना त्यांच्या मित्रमंडळीनी मोलाचे सहकार्य केले. काही ठिकाणी विजेच्या वायर तुटलेल्या त्या पूर्ववत करून देण्यात वायरमननी मोलाचे सहकार्य केले.