रत्नागिरीमध्ये कोकण रेल्वे सेवा सुरु झाल्यापासून मोठ्या प्रमाणात निराधार माणसे, तृतीयपंथी, मानसिक रुग्ण, भिकारी यांचा वावर सुरु झाला आहे. रत्नागिरी मधील एस.टी थांबे, एखादी मोकळी जागा, एस. टी बसस्थानक, रेल्वे स्थानक अशा अनेक ठिकाणी अशी निराधार स्त्री पुरुष दिसून येतात. अनेक संस्थांद्वारे त्यांचे पुनर्वसन देखील केले जाते. त्यातीलच एक संस्था माहेर. माहेर संस्थेने अनेक अनाथ, निराधार, लहान मोठ्या वयोगटातील मुले, महिला, वृद्ध, मानसिकरित्या दुर्बल अशी अनेक प्रकारच्या मानवजातीला आश्रय दिला आहे.
रत्नागिरीतील लक्ष्मीचौक परिसरामध्ये एका एस.टी शेडमध्ये खुप दिवसापासून एक बेवारस व्यक्ती आढळून येत असल्याचे वृत्त समजल्यावर माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी त्वरित तिथे प्रत्यक्ष जाऊन वृत्ताची खातरजमा केली. तर खरोखरच एक ५० वयाच्या आसपास असलेली एक व्यक्ती अतिशय वाईट अवस्थेमध्ये दिसून आली. अंगावर असलेले मळकट कपडे, शरीराला कित्येक दिवस अंघोळ न केल्याने येणारा दुर्गंध, अन्न पुरेसे न मिळाल्याने निट चालता, बसता सुद्धा येत नव्हत, अशा अस्वच्छ आणि दुर्गंधीत ठिकाणी वादळ,वारा,पाऊस सहन करत कित्येक दिवस ही व्यक्ती अशीच झोपून असल्याचे निदर्शनास आले. केवळ भिक मागून मिळेल ते खाऊन पोट भरत होती. पण सध्या असलेल्या लॉकडाऊन मुळे ते पण मिळणे कठीण बनले आहे.
कित्येक दिवस अशाच गलिच्छ वातावरणात राहिल्याने त्या व्यक्तीची तब्ब्येत खालावली होती. त्यामुळे उपचार करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी माहेर संस्था पुढे सरसावली आहे. या कोरोना महामारीच्या काळात सख्खी नाती सुद्धा दुरावलेली आपण पहिली आहेत, परंतु, या काळातसुद्धा माहेर संस्थेने त्या निराधार व्यक्तीला दिलेला आधाराचा हात नक्कीच मानवतेच प्रतिक आहे.