रत्नागिरीमध्ये लॉकडाऊन असल्याने पाणी व्यवस्थापनाचे काम वेगात सुरु आहे. एरवी असणारी रहदारी आणि गर्दी त्यामुळे ही कामे रात्री करावी लागत असत. रत्नागिरी शहरासाठी कोट्यावधी रुपयांची पाणी व्यवस्थापन योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने नगरपालिका वेगवान गतीने प्रयत्न करत आहे. पाण्याच्या पाईप लाईन टाकण्यासाठी अख्खी रत्नागिरी दुतर्फा खोदली गेली आहे. एखादे छोटे वाहन नेण्यासाठीसुद्धा तारेवरची कसरत करत जावे लागत आहे. दोन माणसे एकत्रित सुद्धा चालू शकतील कि नाही या बद्दल शंका आहे. एवढी खोदकामामुळे रस्त्यांची अवस्था भीषण झाली आहे. जनतेमध्ये त्यामुळे नाराजीचा सूर आळवला जात आहे.
रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे कि, कोरोनाचे संकट आणि अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपलेला पावसाळा त्याच्या आधी पाण्याचे व्यवस्थापन सुरळीत करून रस्त्यांची कामे सुद्धा वेळेपूर्वी करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम सुरु आहे. त्यासाठी आरडीसामंत बांधकाम संस्थेचे अण्णा सामंत, उद्योजक किरण सामंत यांचे या खोदलेल्या रस्त्यांचे नियोजित वेळेमध्ये काम पूर्ण आणि चांगल्या दर्जाचे व्हावे याकडे जातीनिशी प्रयत्नशील आहेत.
नगरपरिषद भागामध्ये तयार होणार्या नवीन बिल्डींग्स, घरे, नवीन पाणी कनेक्शन्सची मागणी केलेल्याना व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा यासाठी रस्ते खोदून पाण्याचे पाईप टाकण्यात येत आहेत. त्यामुळे रस्त्यांची अवस्था एवढी भयानक झाली आहे कि, “खड्डेमय रत्नागिरी झाली आहे कि, रत्नागिरी खड्ड्यात गेली आहे” असा जनतेला प्रश्न पडला आहे.
पावसाने कृपा केली तर चांगल्या दर्जाचे डांबरी रस्ते लवकरच आपल्या रत्नागिरीमध्ये तयार होतील असा विश्वास नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी व्यक्त केला आहे.