पोलिसांचे आयुष्य किती गुंतागुंतीचे असते त्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. कोणताही सणवार असो, एखादा कार्यक्रम असो, मंत्री आले, दिवस रात्र ड्युटी सुरु असते. कोणत्याही सणासुदाला घरी राहायला मिळत नाही म्हणून कुटुंबाच्या तक्रारी सुद्धा असतात. परंतु, देश सेवेसाठी अंगावर घातलेली वर्दी आणि तिच्या कर्तव्यापुढे सगळच पोलिसांना फिके वाटते.
सोशल मिडीयावर अनेक व्हिडियो व्हायरल होत असतात, आणि त्यातील काही व्हिडियो अचानक एवढी प्रसिद्धी घेतात कि अक्षरश: कमेंट आणी लाईकसचा पाउस पडतो. ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठी नाचवणाऱ्या पोलिसाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आणि हा तंदुरुस्त पोलीस कोण आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागली. त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हीडिओवर तर कमेंट्साच पाऊस पडला आहे.
१६ एप्रिलच्या या व्हिडिओत कोल्हापूरमधल्या जोतिबा यात्रेत एक पोलीस कॉन्स्टेबल सासनकाठी नाचवताना दिसतात. हलगीच्या ठेक्यावर गुलालाने माखलेला हा पोलीस तरुण तोल सांभाळत सासनकाठी नाचवताना पाहताना अनेकांचं भान हरपून गेलं आहे. रवींद्र माळी असं यो पोलिसाचं नाव असून ते कोल्हापूर येथे त्यांचं पोस्टिंग आहे. सध्या ते पोलीस मुख्यालयात काम करतात. बंदोबस्तासाठी रविंद्र ज्योतिबा डोंगरावर होते.
दरवर्षी चैत्र पोर्णिमेच्या दिवशी ज्योतिबा डोंगरावर देवाची यात्रा असते. यावेळी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक डोंगरावर दर्शनासाठी येत असतात. कोरोनामुळे गेलीं दोन वर्षं यात्रेवर बंधनं होती. या यात्रेत सासनकाठी नाचवण्याची मोठी परंपरा आहे. गावोगावच्या सासनकाठ्या या यात्रेत नाचवल्या जातात. त्याचवेळी त्यांच्या गावाची म्हणजेच कुरूंदवाडची सासनकाठी समोरून येताना त्यांना दिसली.
त्या अनुभवाबद्दल माळी सांगतात, माझी काठी समोरून येताना दिसली. माझे वडील भाऊ, मित्र गावकरी सगळे उत्साहात काठी नाचवत येत होते. कधी एकदा ती काठी हातात घेऊन खांद्यावर नाचवेन असं झालं होते. जेव्हा काठी समोर आली तेव्हा मात्र मी स्वतःला रोखू शकलो नाही. सगळ्यांच्या सोबत देहभान विसरून सासनकाठी नाचवली. पोलिसाचा गणवेश अंगावर होता अन् मनातून देवाची भक्ती होती.
हे सगळं करताना याचा कुणीतरी व्हिडिओ करेल आणि तो वायरल होईल हे ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. पण आता खूप आनंद होतोय. लोक फोन करुन, मेसेज करुन अभिनंदन, कौतुक करतात यामुळं भारी वाटतंय. स्वतःच्या तब्येतीबाबत जागृक असतो. माझी वर्दी माझ्या अंगावर शोभून दिसावी यासाठी मी प्रयत्नशील असतो.