सध्या सर्वत्र आंब्याचा मोसम सुरु झाला असून, अनेक खाजगी वाहने विक्रीसाठी मुंबई, पुणे विविध ठिकाणी मालाची पोहोच करण्यासाठी रस्त्यावरून धावताना दिसतात. कोकणातील आंब्याची लज्जतच न्यारी असल्याने रत्नागिरी आणि देवगड हापूसची विक्री हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात होते. परंतु, रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघातांच्या मालिका सुद्धा वाढू लागल्या आहेत.
रत्नागिरी-खेड येथे बोलेरो व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये देवगड तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास भोगाव संत तुकाराम मंदिरशेजारी देवगडकडून मुंबई- वाशीच्या दिशेने जाणारी बोलेरो पिकअप व जयगडहून ठाणे-मुंबईकडे जाणारा ट्रक यामध्ये समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला.
या अपघातात देवगड तालुक्यातील तुषार प्रकाश चव्हाण वय २४, रा. नारिंग्रे व नीलेश मनोहर शेट्ये वय ३७, रा. मुणगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश उत्तम कोयंडे वय २४, देवगड याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नारिंग्रे येथील तुषार चव्हाण हा अविवाहित आहे. तर मुणगे येथील नीलेश शेट्ये हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे. तुषार व नीलेश याच्या अपघाताची बातमी सकाळी गावात समजताच नारिंग्रे व मुणगे गावावर शोककळा पसरली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. मुंबई वाशी येथे बोलेरो पीकअप देवगड येथून आंबे घेवून जात होती. घटनास्थळी वाहनांची अवस्था पाहूनच भीषणता लक्षात येते.