शिवसेना नेते रामदास कदम यांनी लिहलेल्या “जागर कदम वंशाचा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जामगे येथील कोटेश्वरी मनाई देवीच्या प्रांगणात शाही दिमाखात संपन्न झाला. या पुस्तकाच्या प्रकाशना प्रसंगी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेना नेते रामदास कदम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते आहेत. रामदासभाई तुम्हाला निवृत्त होता येणार नाही. आपली चांगली टीम आहे. समाजाला आपली गरज आहे. आपण कायमच पक्षासाठी आणि समाजाच्या हितासाठी आपण स्वतःला झोकून देत काम केले आहे. आमदार योगेश कदम आपल्या मतदारसंघात चांगलं काम करत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लिहलेल्या ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले, भाई आपण केवळ पुस्तके लिहण्याचा विचार करू नका, आपली ‘सेकंड इनिंग’ जोरदार सुरु करा”, तुम्ही डोक्यात काही ठेऊ नका असे मोठे विधान राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मागील अडीच वर्षांपासून रामदास कदम यांचा पक्षातील नाराज नेत्यांमध्ये समावेश आहे. अनेकवेळा अंतर्गत गटबाजीमुळे थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बाबत अनेक विषयांवर बोलले. मध्यंतरीच्या काळात देखील आपण दोन पुस्तके लिहिलीत आणि तिसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला यायचा आम्हाला योग मिळाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर एकनाथ शिंदे, राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार जयंत पाटील, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, मराठा समाजाचे नेते केशवराव भोसले, आमदार योगेश कदम, युवा सेनेचे नेते सिद्धेश कदम, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णा कदम यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.