रत्नागिरी येथील हायटेक बसस्थानकाचे काम गेली चार वर्षे रखडले आहे. यामध्ये प्रवासीवर्ग चारी बाजूंनी भरडला जात आहे. उन्हाचे चटके सहन करत बसस्थानकासमोरील थांब्यावर प्रवासी थांबलेले असतात. सध्या उन्हाळा सुरु असल्याने या हंगामात वातावरण अतिशय तापते. त्यामुळे लहान मुले, वृद्ध, महिला अशा सर्वच जनतेला उष्म्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
बसस्थानकाचे काम आधी पासूनच कासव गतीने सुरु होते त्यामध्ये कोरोना काळामध्ये ते बंदच पडले. ते अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे जनतेला रिक्षा किंवा बसची प्रतीक्षा करत रस्त्यावरच उन्हा तान्हात उभे राहावे लागते. रस्त्याच्या बाजूला झाडे देखील नसल्याने सावली देखील नसते त्याचच आता उन्हाळा संपत आला असून, लवकरच पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत.
थोड्याच दिवसात पाऊस आता कधीही सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे पावसातही प्रचंड हाल होणार आहेत. या सर्व भोंगळ कारभाराची दखल विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी घेतली. त्या तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आल्या असता, कोकण फिरता फिरता त्यांनी आजूबाजूच्या परिसरात अनेक निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याचप्रमाणे मागील चार वर्षापासून, रखडलेल्या बसस्थानकाचे काम लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तात्पुरती सोय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवाशांसाठी कच्ची निवारा शेड उभारण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
एसटी बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या हायटेक प्रकल्पाच्या बांधकामाला कोरोनाचा फटका बसला. त्यानंतर रेंगाळलेल्या या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. त्यामुळे हे बांधकाम कधी पूर्ण होईल किंवा अशीच परिस्थिती जैसे थे राहील याबाबत जनतेची संभ्रम अवस्था झाली आहे.