बॉलिवूड गायक केके यांचे मूळ नाव कृष्ण कुमार कुन्नथ यांचे मंगळवारी वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले. परफॉर्मन्सनंतर ते अस्वस्थ अवस्थेत हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान, गायक अंकित तिवारीने ट्विटरवर केके यांचा शेअर केलेला एक व्हिडियो जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीत जन्मलेले प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ यांना इंडस्ट्रीत केके या नावाने ओळखले जाते. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली. केके यांनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी सुमारे ३५ हजार जिंगल्स गायल्या होत्या.
२०२१ मध्ये केके यांना मिर्ची म्युझिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे शिक्षण दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये झाले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवीपर्यंतचे सर्व शिक्षण घेतले. १९९९ क्रिकेट विश्वचषकादरम्यान केके यांनी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘जोश ऑफ इंडिया’ हे गाणे गायले होते, त्याला तुफान प्रसिद्धी मिळाली असून, त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सनी देखील काम केले होते. केके यांनी सर्वांच्या हृदयावर कायम राज्य करणाऱ्या ‘पल’ या म्युझिक अल्बममधून आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली होती.
कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्ट व्हिडिओमध्ये केके ‘आंखों में तेरी’ हे रोमँटिक गाणे गाताना दिसत आहेत. गाताना ते प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलींकडे माईक फिरवतात आणि त्यांना गाणे म्हणायला सांगतात. त्यानंतर ते गमतीने ‘हाय, मैं मर जाऊं यहीं पे.’ असे म्हणतात. पण अनपेक्षित पणे तोंडातून निघालेले शब्द काही वेळानंतर खरे ठरतील.
केके त्यांच्या अकाली निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव आज फ्लाईटने ९ वाजेपर्यंत मुंबईला आणण्यात येणार असून, व्हर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.